आईला चिन्हं आलं ऑटो, पठ्ठ्यानं ऑटोच घरावर ठेवला !
खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराला निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्यामुळे या उमेदवाराच्या मुलाचे खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घराच्या छतावर नेऊन ठेवला आहे. (Buldana grmpanchayt election rickshaw)
बुलडाणा : ग्रामीण भागात गुलाबी थंडीत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे (grmpanchayt election) वातावरण चांगलंच गरम झालं आहे. त्यात सरपंचपदाची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार असल्यामुळे सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेयत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत आहेत. असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक (sutala grmpanchayt election) लढवणाऱ्या एका उमेदवाराने आजमाविला आहे. निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्यामुळे या उमेदवाराच्या मुलाने खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घरावर नेऊन ठेवला आहे. (In Buldana sutala grmpanchayt election contesting candidate kept real auto rickshaw on his terrace)
सध्या ग्रामपंचायत निवडणुकींमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील प्रमुख पक्षाचे नेते निवडणुकीत लक्ष घालून आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचा सरपंच व्हावा असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातच उमेदवार सुद्धा आपली ताकद पणाला लावून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथील गीताबाई रहाटे यांना ऑटोरिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे गीताबाई यांच्या मुलाने त्यांच्या घरावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवलाय.
गीताबाई यांच्या मुलाने अशा प्रकारे घरावर ऑटो ठेवला आहे.
ऑटोरिक्षा ठेवण्यासाठी क्रेनची मदत, रात्र नेत्रदीपक रोषणाई
हा ऑटोरिक्षा छतावर ठेवण्यासाठी गीताबाईंच्या मुलाने चक्का क्रेनचा वापर केला आहे. एवढंच नाही तर या ऑटोरिक्षावर रोज रात्री ते नेत्रदीपक रोषणाई करतात. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला आहे. नेत्रदीपक रोषणाई केल्यामुळे त्यांच्या घरासमोर रोज बघ्यांची गर्दी होते. गीताबाई तसेच त्यांच्या मुलाला नागरिकांकडून याबद्दल विचारले जात आहे.
दरम्यान, निवडणूक म्हटलं की उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे नुस्के हमखास वापरले जातात. वापरलेल्या नुस्क्यांमुळे यश पदरात पडतंच असं नाही. त्यामुळे खामगाव तालुक्यात छतावर ठेवलेला ऑटो पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असले तरी गावाचा विकास करण्यासाठी उभी राहिल्याचा दावा गीताबाई करतात. त्या निवडणूक जिंकतील किंवा नाही हे आगामी काळात समजेलच. मात्र, छतावर ऑटोरिक्षा ठेवण्याच्या या अचाट कल्पनेची चर्चा मात्र महाराष्ट्रभर होत आहे.
संबंधित बातम्या :
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?
मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!
राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत; ‘या’ गावची निवडणूक अंजली पाटीलमुळे चर्चेत
(In Buldana sutala grmpanchayt election contesting candidate kept real auto rickshaw on his terrace)