सडलेला कांदा, किडलेली कोबी, प्रशासकीय यंत्रणाही किडली; भाजप आमदाराच्या रागाचा पारा चढला
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला १८०० रुपये खर्च शासन देते. सोबतच शिक्षकांचा लाखोंचा पगार, सोयी सुविधा देण्यात येताहेत. पालकही मोठ्या अपेक्षेने आपल्या मुलांना येथे शिक्षणासाठी पाठवतात. मात्र...
चाळीसगाव : 10 ऑक्टोबर 2023 | सडलेला कांदा, किडलेली कोबी, सडलेले बिट, पिकलेले गिलके, खराब तांदूळ यापासून बनवलेलं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातंय. जनावर, गुरं यांनाही असं कुणी खायला देत नाही. सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचं जेवण शासकीय निवासी शाळेतील मुलांना मिळतंय. चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील मुलांच्या जीवाशी हा जीवघेणा खेळ सुरूय. भाजप आमदारांनी केलेल्या पाहणीतून ही गंभीर बाब समोर आलीय. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून चांगल्या सुविधा असणारी शाळा केली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जेवणावर महिन्याला १८०० रुपये खर्च शासन देते. शिक्षकांचा लाखोंचा पगार, सोयी सुविधा देण्यात येताहेत. पालकही मोठ्या अपेक्षेने आपल्या मुलांना येथे शिक्षणासाठी पाठवतात. मात्र, ठेकेदार आणि प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक या शाळेला भेट दिली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना सडलेल्या आणि किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शाळेतील शौचालय व स्नानगृहे यांचे दरवाजे तुटलेले आढळले. तसेच. बेडच्या साईजप्रमाणे गाद्या नव्हत्या. या प्रकारामुळे आमदार संतापले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी काही मुलांना समोर बोलावून त्यांचा अभ्यास कसा आहे याची पडताळणी केली. तेव्हा, दहावीमधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही. शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचे नुकसान होत आहे असा संताप आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. मात्र. शाळेच्या स्वयंपाकघरात किडलेल्या भाजीपाल्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणादेखील किडली आहे अशी टीका त्यांनी केली. शासनाच्या गरीब कल्याणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. सदर गंभीर बाबींची तक्रार मुख्यमंत्री आणि समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार आहे. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरू राहील असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.