धाराशिवमध्ये आरोग्यमंत्र्यांनी बिघडवले उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आरोग्य, मुख्य पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत महाविकास आघाडीचे स्वास्थ बिघडवीत होते. धाराशिव येथील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 बैठक घेतल्या असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे एकच राजकीय खळबळ माजली होती. त्यापाठोपाठ डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार हादरा दिला आहे. धाराशीवचे ( उस्मानाबाद ) ती माजी नगराध्यक्ष, सहा माजी उप नगराध्यक्ष यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा संपन्न झाली. या सभेतून बोलताना उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मात्र, दुसरीकडे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत महाविकास आघाडीचे स्वास्थ बिघडवीत होते. धाराशिव येथील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदनवन येथे हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, सौ. सुवर्णा सागर मुंडे, सौ. आशा सुधीर भवर यांच्यासह अमर विजय गायकवाड, सुभाष सुर्यभान पवार, इंदुमती हौसलमल, साधना कांतीलाल बागरेचा, गीता महेश पुरी, सफुरा शकील काझी या माजी उपनगराध्यक्ष यांचा समावेश आहे.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण मनोहर कापसे ( माजी गटनेता ), सुधीर मुरलीधर भवर ( सरचिटणीस कळंब शहर ), महेश मिठू पुरी ( कार्याध्यक्ष ), उत्रेश्वर बळीराम चोंदे ( उपाध्यक्ष ), माजी नगरसेवक मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, कांतीलाल मोहनलाल बागरेचा यांचा समावेश आहे. या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.