जळगाव : 8 ऑक्टोबर 2023 | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला भाषणाची संधी मिळाली नाही. मात्र, माझे वकृत्व चांगले होते. त्यामुळे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर दसरा मेळाव्यात तीन वेळा भाषण करण्याची संधी मिळाली अशी आठवण मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली. विधानसभेच्या सभागृहात सुद्धा विरोधात असताना मी भाषणासाठी उभा राहिल्यावर अनेकांना विचार करायची वेळ येते. मात्र, आता सत्तेत आहे त्यामुळे आता प्रश्न ऐकावी लागतात आणि त्याची उत्तरं द्यावी लागतात, असे ते म्हणाले
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित युवा रंग 2023 खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी दशेतील आठवणीना उजाळा दिला. आपल्या भाषणात शेरोशायरी करत त्यांनी जोरदार फटकेबाजीही केली.
विद्यार्थी दशेत अभ्यासात पुढे नव्हतो. मात्र, कलेत पुढे होतो. विद्यार्थी दशेतील याच कलेचा फायदा मला राजकारणात झाला. आता राजकारणाच्या कलेत आहे, असे ते म्हणाले. भाषणं चांगली यायची. गायन हा माझा छंद आहे. नोकरी आणि त्यानंतर छोकरी म्हणजेच लग्न यात रस होता. मात्र, गावात शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्यावेळी भाषण चांगली यायची म्हणून लोकांनी आग्रह धरला आणि शिवसेनेत आलो. अध्यक्ष झालो. मग हळू हळू ट्रॅक बदलला आणि राजकारणात आलो. याच विद्यार्थी दशेतील कलेचा मला फायदा झाला आणि राजकारणाच्या कलेत आलो, असे त्यांनी सांगितले.
जळगावमधील या आंतर महाविद्यालयीन युवा रंग 2023 महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उद्घाटक म्हणू उपस्थित रहाणार होते. मात्र, आचारसंहितेमुळे चंद्रकांत पाटील उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑडिओ संदेश पाठवत युवा रंग महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. ७ ते ११ ऑक्टोबर युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यामधून सुमारे १४०० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.