सभागृह नेत्यांना पाहून आमदारांच्या रागाचा पारा चढला, थेट बैठक सोडूनच निघून गेले
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात बैठकीसाठी शहरातील आमदारांना निमंत्रित केले होते. या बैठकीला चार आमदार उपस्थित होते. पण, निमंत्रित नसलेले भाजपचे कार्यकर्तेच या बैठकीत चर्चा करत होते.
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे शहरातील विविध विकासकामांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला अधिकाऱ्यांसह आमदारही उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष बैठकीला सुरवात झाली आणि माजी सभागृह नेते तेथे आले. त्यांना पाहून आमदारांचा रागाचा पारा चढला. त्यांनी थेट या बैठकीतूनच काढता पाय घेतला. पण, जाता जाता त्यांनी थेट पालकमंत्री पाटील यांच्यावरच टीका केली.
पुणे शहर विकासकामांच्या बैठकीत समान पाणीपुरवठा, मेट्रो, जायका असे विषय होते. महापालिकेत भाजपचे गणेश बिडकर हे सभागृह नेते असताना त्यांच्या 2017 ते 2022 या काळात काही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीला गणेश बिडकर यांनाही बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांना पाहून कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर हे संतापले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील प्रश्नांसंदर्भात बैठकीसाठी शहरातील आमदारांना निमंत्रित केले होते. या बैठकीला चार आमदार उपस्थित होते. पण, निमंत्रित नसलेले भाजपचे कार्यकर्तेच या बैठकीत चर्चा करत होते. त्यामुळे ही बैठक प्रशासनाची होती की भाजपची, असा प्रश्न पडल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नदीपात्रातील सहा हजार झाडे तोडली जाणार असून पुणे वाळवंट झाल्याशिवाय राहाणार नाही. त्यामुळे ही बैठक महत्वाची होती. पण, पालकमंत्री यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करत राहिल्यामुळे मी बैठकीतून बाहेर निघून आलो, असे धंगेकर म्हणाले.
तर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश बिडकर बैठकीत आले. ते सभागृह नेते असतानाच्या काळातील काही प्रश्न होते. पण, बैठकीत थोडे बोलून ते धंगेकर यांच्यापाठोपाठ निघून गेले. बिडकर कसे आले असे धंगेकर यांनी विचारले नाही. पण, त्यांचा फोन आला म्हणून ते बाहेर गेले असे मला वाटले. चौकशी केल्यानंतर आमदार धंगेकर निघून गेल्याचे सांगण्यात आले, असे सांगितले.