राष्ट्रवादीचा खरा नेता कोण? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, ‘मी यामध्ये…’
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रात्री उशिरा अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. तर, जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रतेसंदर्भात पात्र दिले.
मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतील असे जाहीर केले. तसेच, विधिमंडळ गटनेते म्हणूनही त्यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. डॉ. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्तीही शरद पवार यांनी जाहीर केली. त्याचवेळी अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही गट आपलाच पक्ष राष्ट्रवादी सांगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता नेमका कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला असून त्यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, माझ्याकडे गेल्या 2 दिवसांत अनेक निवेदन आली आहेत. काही आमदार व राजकीय पक्षांनी निवेदन दिली आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडेही काही निवेदने आली आहेत. या सर्व निवेदने आणि याचिका यांचा अभ्यास केला जात आहे. त्याचे नोटींग तयार करून माझ्यासमोर सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
अद्याप कुठल्याही गटाने किंवा आमदाराने फुट पडल्याचे निवेदन मला दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकच विधीमंडळ पक्ष आहे. त्यामुळे जो निर्णय होईल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी होईल. अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे अशी परिस्थिती उद्भवलेली दिसणार नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
एकपेक्षा अधिक नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व बदलल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मला आता खात्री करून घ्यावी लागेल, की नेमका कोण नेता पक्षाचे नेतृत्व करत आहे. हा निर्णय घेतल्यानंतर मला पुढचे निर्णय घेणे सोपे होईल.
सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यावर मी कुठलीही बाधा आणू शकत नाही. संविधानाने देशात तीन संस्था निर्माण केल्या आहेत. कार्यकारी मंडळ, विधीमंडळ, कायदेमंडळ या तिन्ही संस्था स्वतंत्रपणे काम करत असतात.
एकमेकांच्या कामात तिन्ही संस्था हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे संविधानातील तरतुदीनुसार विधानसभा अध्यक्षांच्या कामात आणि कामाच्या पद्धतीत कुठलीही संस्था ढवळाढवळ करणार नाही असेही नार्वेकर यांनी सांगितले.