देवेंद्र फडणवीस यांनी काढली राहुल गांधी यांची औकात, म्हणाले, सावरकर होण्याची…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तुम्ही कितीही विरोध केला तरीही प्रत्येक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे, मीच सावरकर आहे असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
नागपूर : नागपूर येथे भाजपने सहा विधानसभा क्षेत्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. यातील शंकर नगर येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या सभेला उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तुम्ही कितीही विरोध केला तरीही प्रत्येक नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे, मीच सावरकर आहे असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळच्या काँग्रेसने त्याला विरोध केला. परंतु, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला. त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिले. त्या व्यक्तीचे नाव होते फिरोज गांधी. जे तुमचे आजोबा होते आणि त्यांनी त्यावेळी सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाला समर्थन दिले होते, असे फडणवीस म्हणाले.
जे सरकारच्या पैशावर जिवंत राहतात असे लोक सावरकरांसारख्या देशभक्ताला शिव्या शाप देतात. त्यांना माफी वीर म्हणतात हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राहुल गांधी कधीही सावरकर होऊ शकत नाहीत. सावरकर होण्यासाठी कुणातही औकात नाही. काँग्रेसमध्ये तर कुणाच्यातही सावरकर होण्याची औकात नाही, अशी टीका फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
उद्धव ठाकरे यांना खुर्ची महत्वाची
सावरकर यांना जे माफी वीर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसले आहेत. इतक्या शरमेची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्रामधून सावरकर समलिंगी अशा पद्धतीचे विकृत लिखाण केले होते. पण, उद्धव ठाकरे यांनी त्याचा निषेध केला नाही, त्यांना आपली खुर्ची महत्वाची वाटत होती. आणि आता ही सावरकर यांचा आपण झाल्यानंतर अनेकदा बोलले आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार नाही. पण, शेवटी त्यांच्याबरोबर चालवतच आहात ना ? असा खरमरीत टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.