भिजलेलं पुस्तकं, किड्यांचं साम्राज्य आणि मुलींना अश्रू अनावर, हतबल प्रशासन
पाऊस काय? तो तर नेहमीचाच, असं म्हणत सगळे आपापली कामे करण्यात दंग होते. मोठ्या गाजावाजाने, उत्साहाने घराघरात त्याचं स्वागत झालं. पाक, सात, दहा दिवस त्याची सेवा करायला मिळणार म्हणून सर्व आनंदात होते. पण...
नागपूर : 25 सप्टेंबर 2023 | सणासुदीचे दिवस, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाजिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी सुरु होती. दुकानदारांनी अनेक वस्तूंनी आपली दुकाने सजविली होती. नवे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सजावटीचे साहित्य, धनधान्य, मिठाई दुकानात थाटली होती. तर, ग्राहकही आपल्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतले होते. पाऊस काय? तो तर नेहमीचाच, असं म्हणत सगळे आपापली कामे करण्यात दंग होते. मोठ्या गाजावाजाने, उत्साहाने घराघरात त्याचं स्वागत झालं. पाक, सात, दहा दिवस त्याची सेवा करायला मिळणार म्हणून सर्व आनंदात होते. पण, ते भाग्य त्यांच्या नशिबी नव्हतं.
मंगळवारी गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान झाला. नागपूरमध्येही उत्सवाची धामधूम होती. अशातच गुरुवार उजाडला. पावसाची रिपरिप सुरु झाली. रात्री जोराचा पाऊस झाला. शुक्रवारीही तीच परिस्थिती. मध्यरात्री जोराचा वारा आला आणि काही वेळातच पाऊस धुवाधार कोसळू लागला. सकाळपर्यंत नागपूर पाण्याखाली आले होते.
सहा हजार घरे पाण्याखाली
सणासुदीच्या काळात अनेकांनी नवीन खरेदी करून आणलेले कपडे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, पुस्तके, डिटर्जंट, धान्य, पुस्तकं, सोने-चांदी दागिने सगळं काही पाण्याखाली गेलं. दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालं. नागपूरात पुर आला. १५०० हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरलं. कोट्यवधीचे नुकसान झालं. तर. या पुरामुळे साधारण सहा हजार घरांचं नुकसान झालंय. घराघरात पाणी घुसलं. किचनमधलं साहित्य, धान्य, फर्निचर आदींच मोठं नुकसान झालं.
100 कोटींपेक्षा जास्त नुकसान
नागपूरमधील या पुराने पाच जणांचा बळी घेतला. मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्यास सुरुवात केली. 500 हून अधिक कारचे नुकसान पावसाने केलंय. त्यांच्या दुरुस्तीला किमान दीड ते दोन महिने लागणार आहेत. पुरामुळे विविध भागातील 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय. अंबाझरी, शंकरनगर, हजारी पहाड, बर्डी परिसरातील कारचं सर्वाधिक नुकसान झालंय.
100 टन गाळ, पालिकेसमोर मोठं आव्हान
नागपूरात पुरामुळे जवळपास 100 टन गाळ जमा झालाय. आतापर्यंत महापालिकेने 60 टन गाळ काढून नेलाय. काही वस्त्यांमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रोगराई पसरू नये म्हणून मनपाने ब्लिंचिंग पावडर, फॅागिंग आणि मच्छरांच्या नियंत्रणासाठी फवारणी केलीय. पण, शहरात जमा झालेला गाळ गोळा करण्याचं सर्वात मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. महानगरपालिकेचे एक हजारपेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी हा गाळ काढण्याचे काम करताहेत.
मुलींच्या डोळ्यात अश्रू
नागपूरातील पुरात सापडलेल्या एका वसतीगृहातील 50 मुलींना रेस्क्यू करण्यात आलंय. पुराच्या पाण्यात मुलींची पुस्तकं, कागदपत्र भिजलीय. आता पुर ओसरला असला तरी वसतीगृह परिसरात किड्यांची संख्या वाढलीय. सगळीकडे किड्यांचे साम्राज्य आणि त्यात शैक्षणिक साहित्याची वाईट अवस्था पाहून मुलींच्या डोळ्यात अश्रू तरळले.