मुंबई : पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. ८ मार्च रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने जागतिक महिला दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. मात्र, या जागतिक दिनाच्या दोन दिवस आधी एक निंदनीय घटना घडली. या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत मुद्दा उपस्थित करून विधानसभेत सरकारला जाब विचारला. राज्याच्या राजधानी शेजारी भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर अत्याचार होत आहेत. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अशा प्रसंगांना त्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे अशी टीका अजित पवार यांनी सरकारवर केली.
राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील एका गावातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होत आहे. ६ मार्च २०२३ रोजी पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
त्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याचे कारण म्हणजे त्या महिलेने केवळ पाणी भरले. या घटनेचा गुन्हा दाखल करायला मुद्दाम विलंब केला गेला. राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबले गेले असा आरोप अजित पवार यांनी केला.
डहाणू येथे घडलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी आणि पिडीत आदिवासी भगिनींना न्याय देण्यात यावा असे ते म्हणाले.
पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे. पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत. त्या आदिवासी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे या भागात नियमीत पाणीपुरवठा करून देण्यात यावा असेही अजित पवार यांनी सांगितले.