भाजप मंत्र्यांविरोधात काँग्रेस नेत्याच्या मदतीला धावल्या भाजपच्या माजी आमदार, नेमकी खलबतं काय?
राज्यात खळबळ माजविणारी एक महत्वाची बातमी आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजच्या एका मंत्र्याला धक्का देण्यासाठी काँगेसचे ज्येष्ठ नेते रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे या कॉंग्रेस नेत्याला भाजपच्या माजी आमदाराने साथ दिल्याने निवडणुकीत त्या नेत्याची ताकद वाढली आहे.
संगमनेर : राज्यातील महत्वाच्या अशा संगमनेर येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत चेअरमनपदी सुधीर लहारे तर व्हाईस चेअरमनपदी विजय दंडवते यांची निवड झाली. गणेशनगर कारखाना निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पँनलचा पराभव केला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने जुळलेल्या राजकीय गणिताची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
मुख्यमंत्री निवडीप्रमाणे आनंद झाला
मुख्यमंत्री निवड होते त्यावेळी जसा आनंद होतो तसाच आंनद आज झाला आहे. गणेश साखर कारखाना पुन्हा एकदा नावारूपाला यावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करावे अशी आमची इच्छा आहे. विखे पाटील यांनी केलेल्या कराराची आम्हाला अडचण येणार नसेल तर आनंद आहे. तसेच, गणेश कारखान्याची निवडणूक आणि राहाता विधानसभेचे राजकारण एकत्रित करण्याचे काहीच कारण नाही असे काँगेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यांनी सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबातून आणि कठीण परिस्थितीतून वर आलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे सनदी अधिकारी केंद्रेकर आहेत. जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी आग्रही असलेला असे ते अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्वेच्छा निवृत्तीसाठी दबाव असेल असे मला वाटत नाही असे ते म्हणाले.
मोदीजींनी आरोप करणे आणि आकडेवारी मांडणे मला काही योग्य वाटलं नाही. पंतप्रधान असे पद आपल्याकडे असते त्यावेळेस अत्यंत तोलून मापून बोलले पाहिजे असे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कारखान्याच्या भूमीवर मला राजकारणावर काही बोलायचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ते सुद्धा आगामी काळात मदत करतील
तर, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी हा विजय सर्व सभासदांचा आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा राज्यात तर होणारच असे सांगत करार मागे घेतल्याबद्दल विखे पाटलांचे त्यांनी आभार मानले. केंद्र आणि राज्य सरकारची मदत घेऊन आम्ही हा कारखाना चालवू. कारखान्याला काही अडचणी आल्यास विद्यमान महसूलमंत्री यांचे अनेक कार्यकर्ते सोबत आहेत. ते सुद्धा आगामी काळात मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.