‘याचा आम्ही समाचार घेऊ…’ संजय राऊत यांना कुणी दिली धमकी?
संजय राऊत यांच्या त्या विधानावरून शिवसेना ( शिंदे गट) आक्रमक झाला आहे. मंत्री उदय सामंत यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्याने राऊत यांना जाहीर इशारा दिला आहे.
सातारा : 29 सप्टेंबर 2023 | शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना पक्षाची स्थापन केली होती का? अशी टीका केलीय. संजय राऊत यांची ही टीका शिंदे गटाला फारच झोंबलीय. मंत्री उदय सामंत यांच्यानंतर आता मंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. राऊत यांचा आम्ही समाचार घेऊ असेही ते म्हणालेत.
भाजपचे 7 आमदार लोकसभा निवडणूक लढविणार आहेत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढविणार आहोत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी वेळकाढूपणाचा आरोप केला. जर अध्यक्ष खरंच वेळकाढुपणा करत असतील तर त्यावर न्यायालय योग्य विचार करेल. या सर्व प्रकाराचे योग्य नियोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे तरीदेखील ठाकरे गटाचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. याबाबत न्यायालय योग्य निर्णय देईल असे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
राज्यात कंत्राटी पध्दतीने भरतीबाबत प्रसारमाध्यमांनी विनाकारण गैरसमज पसरवु नये. तहसीलदाराची कुठेही कंत्राटी पध्दतीने भरती करण्याची जाहिरात काढण्यात आलेली नाही. परंतु काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. पुर्वी जे चालवत होते तेच सरकार आता चालवत आहे. त्यामुळे जी माहिती मिळत आहे ती चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासन योग्य विचार करेल
दसरा मेळावा घेण्याबाबत महानगर पालिकेकडे पक्षाचे अर्ज आले आहेत. शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणुक आयोगाने अधिकृत आमच्याकडे दिले आहे. त्यामुळे शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे असे पक्षाचे मत आहे. या विषयी मुंबई महानगरपालिका प्रशासन योग्य विचार करेल असा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
आम्ही शिवसैनिक समाचार घेऊ
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली यामध्ये दुमत नाही. बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी वाद निर्माण करु नये. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वडिलांबाबत केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. याचा आम्ही शिवसैनिक समाचार घेऊ, असा इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांना दिला.
मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात नाराजी नाही
प्रत्येक मंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम असतात. या गडबडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कदाचित गेले नसतील. ते का गेले नाहीत याची मला माहिती नाही. मात्र, गणपती दर्शनाला उपमुख्यमंत्री गेले नाहीत याचा अर्थ दोघांमध्ये नाराजी आहे असे पुर्ण चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.