गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील डोरवी गावात एक पडीक विहीर होती. त्या विहिरीचे पुनर्जीवन करून सुस्थितीत आणण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून त्या विहीरीसाठी पाच लाखांचा खर्च केला गेला. त्यात मोटार पंप टाकला होता. लोखंडी जाळी बसवली. विहिरीत पाण्याच्या टाकीतील ओव्हरफ्लोचे पाणी सोडून ती विहीर पुनर्जीवन करण्यासाठी प्रयत्न केले गेले. नळाचे पाणी कमी पडल्यास विहिरीतील पाणी ग्रामस्थ जनावरांसाठी, बांधकामासाठी किंवा अन्य वापरासाठी वापरत होते.
मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून डोरवी गावातील ही विहीर अचानक गायब झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत आणावे लागत आहे. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सिंदखेड राजा पंचायत समितीच्या सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
महत्वाचे म्हणजे गावचे सरपंच यांना ही विहीर कशी गायब झाली याबद्दल काहीच माहिती नाही. मात्र, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची ही विहीर मागील आठ पंधरा दिवसांपूर्वी एका ग्रामपंचायत सदस्यानेच दगड मुरूम टाकून बुझवल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिलीय. ग्रामसेवक यांच्यासमोरच हा प्रकार घडला असेही त्यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी पाच लाख रुपये खर्च करून विहीर बांधली. पण, आता ही विहीर बुझवणाऱ्यावर कडक कारवाई करावी. तसेच, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची ही विहीर ग्रामस्थांना तत्काळ खुली करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून केलीय. सिंदखेड राजाचे बिडीओ यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनीही याप्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी अंती योग्य कारवाई करू, असे आश्वासन दिले.