कामाला लागा… उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘मातोश्री’वरील बैठकीत काय घडलं?
लोकसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे. मात्र, त्यापूर्वीच ठाकरे गटाने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर एका बैठकीचं आयोजन केलं होतं. पक्षातील नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आणि निवडणुकीचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी बैठकीला आलेल्या नेत्यांशी संवाद साधला. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेशच दिले. आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. गाफील राहू नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर आणि सुभाष देसाई उपस्थित होते. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. निवडणुकीचे नियोजन करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
दिवाळीनंतर तोफा धडाडणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरूआहे. त्यापार्श्वभूमीवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेसह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे करण्याचा निर्णय घेण्यता आला. दिवाळीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्रात दौरे होणार आहेत. निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सभांचे सुद्धा नियोजन केले जाणार
मराठा आरक्षणावर चर्चा?
दरम्यान, या बैठकीत मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणूक निकाल यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचंही सांगितलं जातं. तसेच लोकसभा निवडणूक संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. याशिवाय शिवसेनेतून जे खासदार सोडून गेले, त्यांच्या मतदारसंघात जास्त जोर लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे परवा मुंब्र्यात
दरम्यान, मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून वाद सुरू आहे. या शाखेची स्वत: उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. परवा 11 तारखेला दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार आहेत. यावेळी ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले आले होते. आता उद्धव ठाकरेच येणार असल्याने परवा मुंब्र्यात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंब्र्यात येऊन उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.