सुनील ढगे, नागपूर | 22 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाचा कौतुक देश पातळीवर केले जाते. पण, विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच घाणेरडे राजकारण करण्याचे काम भाजप करत आहे. त्याचे दर्शन झाले. शेड्युल दहाप्रमाणे माननीय अध्यक्ष यांना सर्वाधिकार आहेत. परंतु, वेळेच्या बंधनात त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागले. विधिमंडळाच्या व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम आताचे लोक करतात अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. यामधून चित्र स्पष्ट होतं की खुर्ची महत्वाची आहे आणि ती कायम रहावी. त्यामुळे आज जे चालले आहे ते बरोबर चाललेलं नाही असेही ते म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या साक्षीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आमदार झालो असे म्हटले. पण, त्यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने अशी कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे चालले आहे. त्या प्रोसिडिंगमध्ये दुरुस्ती व्हावी. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही यावर चर्चा करू. विधानसभा अध्यक्ष यांना अधिकार असतात. मात्र, ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही. त्याचा आम्ही जाब विचारू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
महाराष्ट्राची प्रतिमा खराब होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देऊन ते पुढे म्हणाले, भाजपचा चिडलेला चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्यात जी निवडणूक होत आहे. त्यामध्ये त्यांची हार ठरलेली आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रींय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधाण सभा निवडणूक लढवीत आहोत. प्रधानमंत्री, गृहमंत्री यांच्या सभेला लोक जमा होत नाही. त्यामुळे त्यांची हार ही निश्चित ठरलेली आहे. अशावेळी सूड उगवून भाजपने नॅशनल हेराल्डवर कारवाई केली असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आमची शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या तरी आमचे लक्ष पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे आहे. ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. तसेच, वंचित बहुजन आघाडी संदर्भातील कुणी चर्चेचे निमंत्रण दिले असेल तर प्रदेशाकडे अशी काही माहिती नाही. त्यांना परस्पर कुणी दिले असेल तर माहिती नाही असे पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरीधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात जी काही भूमिका मांडली आहे. त्याची आपणास काही माहिती नाही. मी निवडणुकीच्या प्रचारात असल्यामुळे नेमकं काय झालं हे माहित नाही. ज्यावेळी आम्ही एकत्र भेटू त्यावेळी चर्चा करू. पण, छत्तीसगडमध्ये ज्याप्रमाणे आदिवासी, ओबीसी, एससीमध्ये आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मुस्लिम यांच्यासारख्या काही मागास जाती असतील तर आरक्षणात वाढ करायला हवी. ही काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे जुमलेबाजी बंद करावी, असे पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये भाषण करताना तरुणांनी आवाज मारला. सोशल मीडियावर पनौती शब्द प्रचलित झाला. राहुलजींनी त्यावेळी जे वक्तव्य केलं त्यात त्यांनी मोदी यांचे नाव घेतलेलं नाही. भाजप तसं म्हणत आहे. सोशल मीडियावर ‘पनौती’ शब्द येत आहे ते सार्वजनिक मत लोकांचे होते. मॅच असताना राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. पण, खेळात राजकारण तयार करण्याचे काम सुरू झाले ही जनभावना आहे. खेळाडू देशासाठी खेळतो आणि बाजूला पडतो. गेल्या 10 वर्षात वर्ल्ड कप झाले असे नाही. काँग्रेसच्या काळातही आपण खेळत होतो. जिंकत होतो. परंतु, खेळात राजकारण येऊ देऊ नये असे आमचे मत आहे असे पटोले यांनी यावेळी सांगितले.