सावधान! नदीला प्रदूषणाचा विळखा; चंद्रभागेचा जीव गुदमरतोय
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरचा लौकिक आहे. त्याचबरोबर भीमाशंकरच्या अभयारण्यातून उगम पावलेली भीमा नदी पंढरपूरच्या आध्यात्मिक इतिहासाचा वारसा सांगते. मात्र याच भीमा नदीचा म्हणजेच चंद्रभागेचा श्वास आता गुदमरतोय की काय अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झालीये.

पंढरपूर : देशाची दक्षिण काशी म्हणून पंढरपूरचा (Pandharpur) लौकिक आहे. त्याचबरोबर भीमाशंकरच्या अभयारण्यातून (Bhimashankar Sanctuary) उगम पावलेली भीमा नदी पंढरपूरच्या आध्यात्मिक (Spiritual) इतिहासाचा वारसा सांगते. मात्र याच भीमा नदीचा म्हणजेच चंद्रभागेचा श्वास आता गुदमरतोय की काय अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झालीये. जगभरातील वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या पांडुरंगाची नगरी ज्या नदीच्या काठावर वसली ती म्हणजे चंद्रभागा नदी. खरंतर भीमाशंकरपासून उगम पावलेल्या या भीमा नदीचे पंढरपूरमध्ये आल्यावर चंद्रभागा असे नामकरण होते. कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेत स्नान करण्याची प्रथा आहे. मात्र त्या प्रथेत आता बदल होतो की काय अशी परिस्थिती चंद्रभागेच्या वाळवंटात झाली आहे. अतिशय विस्तीर्ण पात्र असलेल्या चंद्रभागा नदीला आता ओढ्याचे स्वरूप आले आहे. नदीत मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, शेवाळाने नदीचे पात्र व्यापले आहे.
नमामी चंद्रभागासाठी 20 कोटींची तरतूद
वास्तविक पाहता मागील सरकारने नमामी चंद्रभागा प्रकल्पाच्या माध्यमातून नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी 20 कोटींची तरतूदही केली होती. या प्रकल्पाद्वारे नदीत येणारे मैलामिश्रित पाणी, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी रोखण्याचा प्रयत्न याचा समावेश होता. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कागदावरच राहिला की काय अशी अवस्था आजच्या घडीला चंद्रभागा नदीची झाली आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातून याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोन वेळा आषाढीच्या महापुजेला येऊन गेलेत. तर महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी उध्दव ठाकरेंनी इस्कॉन घाटाचे उद्घाटन करुन, चंद्रभागेची महाआरतीसुध्दा केली होती. मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चंद्रभागेची दुरावस्था झाली आहे.
स्थानिक प्रशासनाची उदासीनता
पंढरपूरला आषाढी वारीसह महत्वाच्या चार वाऱ्या होत असतात. त्याद्वारे लाखो भक्तगण पंढरपूर नगरीत येत असतात. चंद्रभागेतील स्नान हे भाविकांसाठी अतिशय पवित्र मानले जाते. मात्र नदी प्रदुषणाबाबत स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाची उदासीनता आहे. त्यामुळेच नदीच्या या बकाल अवस्थेबाबत बोलण्यास एकही अधिकारी समोर येत नाही. त्यामुळेच भाविकांकडून आता ”नमामी चंद्रभागा” ऐवजी ”क्षमामी चंद्रभागा” हे वाक्य ऐकायला मिळत आहेत. स्थानिक नागरिक आणि राजकीय पदाधिकारी देखील याविरोधात आक्रमक झाले आहेत.
संबंधित बातम्या
शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक; आपल्यापेक्षा बिहार भला, ठाकरे सरकारवर निशाणा