नाशिक : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाचा (Rain) जोर वाढल्याने नाशिकच्या (Nashik) नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या स्थितीमध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून 36731 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे यंदा चौथ्यांदा गोदावरी नदीला पूर (Flood) आला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह मुंबई उपनगरात देखील गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात देखील पावसाची संततधार सुरूच असून, सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होत आहेत. हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.