सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन […]
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या अर्ज छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘दगडू’ नावाला आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला आक्षेप घेतला आहे.
उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असून छाननीमध्ये काँग्रेस, भाजप आणि बुहजन वंचित आघाडीच्या तिन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, तर बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांचे खरे नाव दगडू शंभू शिंदे आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुशीलकुमार संभाजीराव शिंदे असा उल्लेख केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. शिंदे यांचे वय 79 नमूद केल्याचाही आक्षेप घेण्यात आला होता. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीचा दाखला आणि नावाबाबतही आक्षेप घेण्यात आला होता. शिवाचार्यांचे मूळ नाव नुरन्दय्या गुरुबसव्वा हिरेमठ असे आहे. त्यासाठी त्यांनी शाळेचा दाखलाही सादर केला होता. उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय देत आक्षेप घेतलेले दोन्हीही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत. सुशीलकुमार शिंदेंनी नावात बदल केलेले गॅझेट जोडले आहे. शिवाय वयाच्या अडचणीबाबत सध्याच्या क्षणी अडचण येत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे बेडा जंगम नसून हिंदू लिंगायत आहे, असा दावा करण्यात आला. मात्र, सिद्धेश्वर यांनी जातीचा पुरावा जोडल्यामुळे त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.