EVM विरोधात विरोधक एकवटले, कायदेशीर अन् रस्त्यावरची लढाई; काँग्रेस यात्रा काढणार, शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना
India Alliance Movement Agaist EVM : विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. काँग्रेस या विरोधात आंदोलन करणार आहे. 'ईव्हीएम छोडो' आंदोलन काँग्रेस करणार आहे. तसंच शरद पवार यांनी देखील पराभूत उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. वाचा सविस्तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुककीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतक्या जास्त जागा येण्याचा ना भाजपला अंदाज होता, ना एवढा दारूण पराभव होईल या महाविकास अंदाज होता. अनेक एजन्सीने केलेल्या सर्व्हेंमध्ये देखील अटीतटीची लढत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा विधानसभेचा निकाल हा सर्वांसाठीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतला आहे.
‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काढणार?
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ काढली होती. आता ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएमवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर भूमिका घेणार आहेत.
कायदेशीर लढाईसाठी वकीलांची फौज
ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलं आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही. कायदेशीर लढाई लढायची आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचाही निर्णय शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी ईव्हीएम विरोधातील लढाईवर मत मांडलं आहे. गेल्या ८ ते १५ दिवसा पासून या या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार असं दिसत होतं. लोकांचा देखील प्रतिसाद देखील होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. काही ठिकाणी मशीन सुद्धा अशा आढळल्या आहे की ७ तास मशीन चालून सुद्धा ९९ % देखील दाखवत आहे, असं राजन विचारे म्हणालेत.
असंख्य तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. जनतेने देखील बघितलेला आहे आणि लोकांना सुद्धा रस्त्यावर उतरावा लागेल आणि अशा पद्धतीने सूरू असेल तर लोकशाही सुद्धा संपून जाईल. मला वाट बेलेट पेपर वर निवडणुका व्हायला पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे. ही लढाई बेलेट पेपरची मागणीची लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत लढाई चालूच राहील, असं विचारे म्हणाले आहेत.