सध्या राज्याच्या राजकारणात विशाळगडाच्या पायथ्याशी झालेला हिंसाचाराचा मुद्दा गाजत आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावरुन हिंसक आंदोलन झालं. या अतिक्रमणाविरोधात संभाजी महाराज छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. त्यानंतर तिथे दगडफेक, तोडफोड झाली. दोन्ही गटात हाणामारी झाल्याने येथे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर परिसराला काल भेट दिली. या विषयावरुन आता जोरदार राजकारण तापलं आहे.
या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलय. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ याच्यावरुन हे विधान केलं. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर होता असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. “भटकळ विशाळगडावर कधीपासून होता? कोणाकडे राहायला होता? याची सखोल चौकशी करणार” असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
सतेज पाटील चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता
‘त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील चौकशीची गरज आहे’ असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात वारंवार घडणाऱ्या दंगली बाबत सर्वांच्या चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली. सतेज पाटील यांनी महिन्याभरापूर्वी दंगली बाबत केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफ यांच्या प्रतिक्रियेमुळे सतेज पाटील चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.
‘पोलीस गाफील राहिले का?’
“शांततेने आंदोलन करण्याचा शब्द दिला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस गाफील राहिले का? नेमके काय झाले? याची चौकशी होईल. शाहू महाराज ही जाऊन आले त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडू नयेत याची आता खबरदारी घेऊ. यात कुणाची चूक होती? याचा तपास होईल. वातावरण पूर्वपदावर येईल, सलोखा राहील, असे प्रयत्न करण्याची गरज. शाहू महाराज यांनीच संभाजीराजांच्या माझ्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे” असं हसन मुश्रीफ म्हणाले.