Bullet Tractor : अवघ्या 8 दिवसात तयार होणारा अनोखा बुलेट ट्रॅक्टर, किंमत फक्त…
सामान्य शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
लातूर : आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती समृद्ध करण्याचं अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न असतं, मात्र हे स्वप्न पैशांअभावी साकार होत नाही. अशा सामान्य शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथील मकबूल शेख यांनी अगदी कमी पैशात बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हा छोटा बाईक ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीची सर्व कामे करतो. अगदी दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो (Innovation of Bullet Tractor in affordable price by Makbul Shaikh in Latur)!
लातूरच्या निलंगा शहरात मकबूल शेख यांचं शेती अवजारांचं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारा बुलेट ट्रॅक्टर तयार झालाय. अगदी बाईकवर हा ट्रॅक्टर स्वार झाला आहे. यासाठी मकबूल यांना एक ट्रॅक्टर बनवायला साधारण 8 दिवस जातात. 1 लाख 60 हजारात सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला उपलब्ध होणारा हा ट्रॅक्टर पेरणी, कोळपणी, फवारणी, नांगरणी याबरोबरच शेतातली सगळी कामं सहजपणे करतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या बुलेट ट्रॅक्टरचे सर्व पार्ट खोलून दुरुस्त करता येणार आहेत. एव्हढ्या सोप्या पद्धतीने हा ट्रॅक्टर बनवला आहे. यामध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हीज कंपनीचे इंजिन वापरण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर 10 आणि 5 एचपीमध्ये उपलब्ध आहे.
आता या व्यवसायाला मकबूल शेख व्यवसायिक स्वरूप देण्याच्या तयारीत आहेत. लातूरच्या ग्रामीण भागातल्या एका युवक व्यावसायिकाने बनवलेला हा ट्रॅक्टर अल्पावधीत राज्यासह कर्नाटक आणि मध्यप्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होतो आहे. नेपाळमधल्या काही शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधून नोंदणीही केली. त्यामुळे भविष्यात हा बुलेट ट्रॅक्टर सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा ठरू शकतो!
हेही वाचा :
‘बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही’, लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल
प्लॅस्टिकपासून पेट्रोल, अवघ्या 40 ते 50 रुपये लिटरने विक्री
व्हिडीओ पाहा :
Innovation of Bullet Tractor in affordable price by Makbul Shaikh in Latur