नवीन संसद भवनातही बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याची मागणी कुणी केली? केंद्राकडे मागणी करण्यासाठी शिंदे यांना कुणाचं पत्र?
पत्रात म्हंटलंय, महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे.
नाशिक : हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नुकतेच विधानभवनात लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने तैलचित्र लावण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित हा सोहळा पार पडला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन विशेष मागणी केली आहे. छगन भुजबळ यांनी पत्र देऊन नवीन संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी केली होती. राज्यशासनाने केंद्र शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा असेही भुजबळ यांनी पत्र देऊन सुचवले आहे.
छगन भुजबळ यांनी पत्रात म्हंटलंय, महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे.
मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले त्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे थोर महापुरूष बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे.
त्यामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल असं छगन भुजबळ यांनी पत्रात म्हंटले आहे. छगन भुजबळ यांनी हे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे.