मुख्यमंत्र्याचा नाशिक दौरा जाहीर झाला आणि नाराज कांदे नाशिक सोडून कुठं गेले ?
आमदार सुहास कांदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी हवी होती, नाहीच मंत्रीपद तर निदान एखादे महामंडळ तरी मिळेल अशी अपेक्षा कांदे यांना असल्याची नाशिकमध्ये चर्चा होती.
नाशिक : नांदगाव मतदार संघाचे आमदार यांच्या नाराजी पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहे. शिंदे गटातील मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर कांदे यांची नाराजी दूर होईल अशी शक्यता असतांना हा वाद आणखीनच चिघळला आहे. आमदार सुहास कांदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येण्याच्या पहिलेच त्यांनी नाशिकच्या निवासस्थानातून बाहेर पडत नांदगावच्या दिशेने रवाना झाले आहे. खरंतर सुहास कांदे हे त्यांच्या मतदार संघात गेल्याची माहिती समोर येत असतांना सकाळपासून निघालेले सुहास कांदे अद्यापही मतदार संघात न पोहचल्याने कांदे नेमके कोठे गेले ? याबाबत शिंदे गटासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिकमधील निवासस्थानी आमदार सुहास कांदे यांनी मी नाराज नाही असं म्हणत उघडपणे पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. आमदार सुहास कांदे यांनी पक्षाच्या कामासह शासकीय बैठकांना मला विश्वासात घेतले जात नाही, मला पालकमंत्री कुठेलेही बैठकीचे निमंत्रण देत नाही असं म्हणत शिंदे गटातील पहिली नाराजी ठिणगी टाकण्याचे कामच कांदे यांनी केलं आहे.
खरंतर आमदार सुहास कांदे हे शिंदे गटाच्या बंडाचे निशाण फडकविणाऱ्या आमदारांमध्ये पहिले आमदार होते, अगदी घोषणाबाजी देण्यापासून ठाकरे गटाला अंगावर घेण्यात कांदे अग्रस्थानी होते.
आमदार सुहास कांदे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी हवी होती, नाहीच मंत्रीपद तर निदान एखादे मंडळ तरी मिळेल अशी अपेक्षा कांदे यांना असल्याची नाशिकमध्ये चर्चा होती.
शिंदे यांच्या बंडात आमदार सुहास कांदे हे नाशिकमधून पहिले आमदार होते, दादा भुसे हे देखील उशिराने शिंदेंच्या गटात सहभागी झाले होते, इतकंच काय तर खासदार गोडसे हे देखील उशिराने दखल झाले होते.
मात्र, पक्षातील नेमणुका, पक्षाच्या बैठका, पक्षाचे कार्यालयचे उद्घाटन आणि शासकीय बैठकांना निमंत्रण न देणे आणि विश्वासात न घेतल्याने कांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री यामध्ये तोडगा काढून कांदे यांची नाराजी दुर करतील अशी चर्चा असताना कांदे यांनी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येण्यापूर्वीच नाशिक शहर सोडून मतदार संघाच्या दिशेन गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
मात्र, आमदार कांदे हे आपल्या मतदार संघातही नसल्याची माहिती समोर येत असल्याने कांदे यांची नाराजी अद्यापही दूर झाली नसून नाराजीचा वाद आणखी चिघळला गेला की काय ? अशी परिस्थिती सध्या शिंदे गटात पाहायला मिळत आहे.