मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : मोदी सरकार पाच राज्यातील पराभवाच्या भीतीनं घाबरलं आहे. त्यामुळे विरोधकांना त्रास दिला जात आहे. विरोधकांचा आवाज भाजपा दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. जे भाजप सोबत जात आहेत त्यांच्या संपत्ती जप्त केल्या जात नाहीत, परंतू मोदी आणि शहांच्या विरोधात जे जात आहेत त्यांना मुद्दामहून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र जळतोय याचं यांना काही पडलेलं नाही. राज्य सरकारला पाच राज्यांच्या निवडणूकांची चिंता लागली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत ? कि त्यांना डांबून दुसरा कोणी गृहमंत्रालय चालवतोय असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पाच राज्यातील निवडणूकांचा प्रचार शिगेवर असताना नॅशनन हेराल्ड प्रकरणात ईडीने 750 कोटीची मालमत्ता जप्त केल्याच्या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे. जे भाजपासोबत जात आहेत त्यांची मालमत्ता जप्त होते. मी स्वत: ही एक व्हिक्टीम आहे. इक्बाल मिर्चीसह इतरांच्या प्रॉपर्टी मोकळ्या होत असताना सरकार विरोधकांच्या प्रॉपर्टी जप्त करीत आहे. पाच राज्याच्या प्रचारात राहुल गांधी व्यस्त असताना असा प्रॉपर्टी जप्त करून त्रास देण्याचा प्रयत्न पाच राज्यातील पराभवाच्या भीतीनेच भाजपा सरकार करीत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
शिवतीर्थावर शिवसैनिक आंदोलकांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही गृहविभागाची विकृती आहे. शिवतीर्थावर गद्दारांना रोखण्याचा प्रयत्न झाला तर तुम्ही विनयभंगाचे गुन्हे दाखल करता. त्या महिलांची भाषा पाहा. गृहमंत्रालयाने यावर तोडगा काढला नाही तर आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर ही लढाई लढू असे संजय राऊत यावेळी म्हणाले. फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत हे पहावं लागले. त्यांना कोंडून ठेवून दुसराच कोणी गृहमंत्रालय चालवतोय का ? हे पहावे लागेल असेही राऊत यांनी सांगितले.
क्रिकेट विश्वचषक भारताचा पराभव आणि पंतप्रधानांची मैदानातील उपस्थिती यावर राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर ट्रेंड चालू आहे. लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केली असेल. त्यांनी भाषणाची एक पद्धत आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मराठा आणि ओबीसी वादावर राज्यातील परिस्थितीवर गृहमंत्री आणि गृहमंत्रालयाला काही चिंता नाही. त्यांना पाच राज्याती चिंता आहे. परंतू राज्य जळत आहे त्याचे त्यांनी काही पडलेले नसल्याचे राऊत यांनी सांगितले. मनोज जरांगे हा फाटका माणूस आहे. तो त्याच्या समाजासाठी लढत आहे. राष्ट्रपतींना भेटून आम्ही हेच सांगितल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.