
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर ॲड. असीम सरोदे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
पूर्वी क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये कलम 41 होतं ते बीएनएसएसमध्ये 35 झालं आहे, त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे, या मुद्यावर आरोपी कोरटकरचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते. त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टीने इतर केसेससाठी बरोबर असू शकतं. पण या केसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे. कारण जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41ची नोटीस देऊन चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने एका जजमेंटमध्ये सांगिलं आहे. पण नवीन बीएनएसएस कायद्यानुसार, पोलिसांनी अटकेची कारणं दिली पाहिजेत, याबद्दलची कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिली आहेत. त्यामुळे कोरटकरांना केलेली अटक बेकायदेशीर नाही, असं ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले.
तो स्वत: मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर…
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एफआयआर दाखल झाल्यापासून गुन्ह्याच्या तपासामध्ये कोणतंही सहकार्य केलेलं नाही. आरोपींच्या म्हणण्यानुसार, ते (कोरटकर) फरार नव्हते, ते स्वत: या कोर्टात, त्या कोर्टात हजर होते. म्हणजे त्याचा अर्थ काय तर वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले, त्याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते. आणखी एक गोष्ट म्हणजे, नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे ते सांगा, मी यायला तयार आहे, असे ते म्हणाले. पण त्यांचं म्हणणं असं की पोलिसांनी आम्हाला बोलावलंच नाही.
मात्र जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही, तो कुठे आहे ते माहीत नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं ? तो स्वत: मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं ?असा सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित करत टोला मारला. मग पोलिसांनीच आम्हाला बोलावलं नाही, असं खाप फोडायचं का.
आम्ही सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे , तीसुद्धा कमी आहे असं वाटतं, पण प्राथमिक पातळीवर सात दिवसांची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे, कोर्ट काय ऑर्डर देतं ते लवकरच समजेल, असं सरोजे म्हणाले. आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहेत ते शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून घ्यायचे असतात, त्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचं असतं. आवाज बदलला जाऊ शकतो, मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो, त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक असल्याचं सरोदे यांनी नमूद केलं.
त्यादृष्टीने न्यायालयाने आज व्हॉईस सॅम्पलसाठी आदेश देणं महत्वाचं आहे, नाहीतर पोलिसांना पुन्हा पुढल्या वेळेस व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल, नंतर ती प्रक्रिया होईल, असे सरोदे म्हणाले.