Osmanabad : काय सांगता..? आरोग्य मंत्र्यांनीच केली उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार, नेमका प्रकार काय?
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी आपल्याला काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली. त्यानुसार सावंत यांनी प्रकरण गाभीर्यांने घेतले आहे. रेड्डी यांच्या तक्रारीवरुन सावंत यांनी मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.
उस्मानाबाद : शिंदे गटातील (Tanaji Sawant) आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत. मात्र, (Osmanabad Collector) उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना फोनवरुन केलेली दमदाटी ही जरा त्यांनी सबुरीने घेतली असल्याचे चित्र आहे. कारण याप्रकरणी त्यांनी (Chief Secretary) राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून एका विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला केलेली दमदाटी ही अत्यंत गंभीर बाब असून शासनाची प्रतिमा मलीन करणारी असल्याचे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना समज द्यावी अशी विनंतीही त्यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
नेमके प्रकरण काय?
कौस्तुभ दिवेगावकर हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. तर सोमनाथ रेड्डी हे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सावंत यांच्या सांगण्यावरुन जिल्ह्यातील सद्य स्तिथीमध्ये असलेल्या कामांची व प्रगती अहवाल रेड्डी हे संबंधित अधिकाऱ्यांकडून करीत आहेत. मात्र, ही माहिती तुम्ही कोणत्या अधिकारात संकलित करीत आहात अशी विचारणा दिवेगावकर यांनी केली. तर रेड्डी यांनी हे काम मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार करीत असल्याचे सांगितले. यावर अर्वाच्छ शब्दात दाब दिला व माहिती गोळा करू नये असे सांगितले. अशी माहिती संकलित केल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहाल, तसेच माझ्या शासकीय कामात ढवळाढवळ केल्याचा गुन्हा नोंद करतील असा दम रेड्डी यांना दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना नेमके काय खटकले?
महाविकास आघाडी सरकारने सत्तासंघर्षाच्या काळात काळात मंजूर केलेल्या अनेक कामाना शिंदे-भाजप सरकारने स्थगिती दिली आहे. तर अनेक कामे नियमबाह्य केली असल्याची तक्रारी आहेत. त्यांची चौकशी बाकी आहे. जिल्ह्यातील माहिती मंत्री सावंत यांनी संकलन करणे जिल्हाधिकारी यांना खटकले, की रेड्डी यांची मंत्री सावंत यांनी त्यांच्या अधिकारात केलेली नेमणूक ? याबाबत चर्चा रंगली आहे.
सावंत यांची थेट मुख्य सचिवांकडेच तक्रार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी आपल्याला काम करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली. त्यानुसार सावंत यांनी प्रकरण गाभीर्यांने घेतले आहे. रेड्डी यांच्या तक्रारीवरुन सावंत यांनी मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे.
प्रशासकीय वाद चव्हाट्यावर, काय होणार कारवाई?
प्रशासकीय वाद अशाप्रकारे चव्हाट्यावर येण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. दोन अधिकाऱ्यांमधील मतभेद हे थेट राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता काय आणि कुणावर कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.