‘सहन केले जाणार नाही, सोडणार नाही,’ सुप्रीया सुळे यांचा कड्डक इशारा कुणाला?
सुप्रीम कोर्ट हे विधानसभा अध्यक्ष यांच्यावर नाराज आहे. सरकारवर नाराज आहे. प्रशासनावर नाराज आहे. देश हा संविधानावर चालतो कोणत्या अदृश्य शक्तींवर चालत नाही. आमचे राजकारणही संविधानाने चालते अदृश्य शक्तींवर नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : माझ्यासाठी पक्ष हा आईच्या जागी आहे. आई सोबत गैरव्यवहार हा मला मान्य नाही. त्याच्यासोबत कोणी गैरवर्तन करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आमचे खासदार फैजल यांच्याबाबत कोणतीही केस नसताना ज्या पद्धतीने कोर्टाची लढाई लढावी लागली तेव्हा कुठे न्याय मिळाला. आम्ही पक्षासाठी न्याय मागत आहोत. खासदारांचे प्रकरण न्यायालयात नेण्याची शक्यता आहे. वेळ आल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील जुमला पार्टी जनतेची फसवणूक करत आहे. आणखी किती फसवणूक करणार? दिल्लीतील अदृश्य शक्तीच्या जीवावर हे सगळे सुरू आहे. अदृश्य शक्ती नसती तर हा सगळा खेळ जमला असता का? देशात राज्याचे महत्व कसे कमी होईल याचा प्रयत्न केला जात आहे. मी काही खोटे सांगत नाही. अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी हे मी आकडेवारीनुसार सांगू शकते. रोजगारामध्ये राज्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीकाही खासदार सुळे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला यश आले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करते. पण, सरकार कसं खोट बोलतं. रेटून बोलतं याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. राज्यात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. आता मराठा समाजाला सरकारने दोन महिन्याचा कालावधी दिला आहे. आता हे भ्रष्ट आणि जुमले सरकार काय करते ते पाहू. हे खोके सरकार महाराष्ट्रात एक आणि दिल्लीत वेगळे बोलते असा टोला त्यांनी लगावला.




प्रकाश सोळंके यांनी जो आरोप केला आहे तो खरा आहे. गेले काही महिने मी हेच बोलत आहे की गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. मी अनेकांना फोन केले यामागे राजकारण नाही तर माणुसकी आहे. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. पण सरकार फेल्युअर आहे. त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. क्षीरसागर, मुश्रिफ, सोळंके यांना फोन केला. आम्ही द्वेषाचं राजकारणं करत नाही. आम्हीही सत्तेत होतो पण असे उद्योग केले नाही. ईडी, सीबीआय, घर फोड असे उद्योग आम्ही कधी केले नाहीत. आमची त्यांची लढाई ही वैचारिक आहे वैयक्तीक नाही असेही त्या म्हणाल्या.
आम्ही सुट्ट्या घेत नाही काम करतो असे सरकार म्हणते. तर मग काम करून दाखवा. महागाई आणि बेरोजगारी ही देशातील मोठी समस्या आहे. दुध, कांदा, साखर, तांदुळावर हमी भाव कमी मिळतो हे सरकारचे अपयश आहे. काम करता तर मग हमी भाव वाढवून दाखवा असे आव्हानही त्यांनी शिंदे सरकारला दिले.