तीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य प्रकल्पाचा शुभारंभ, महाराष्ट्राला फायदा काय?
या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेट्टी बॅरेजमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे.
गडचिरोली : तेलंगणा सरकारच्या विविध पाणीपुरवठा योजनांचा समावेश असलेल्या कालेश्वरम प्रकल्पाचं (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. या प्रकल्पातील चार उपसा सिंचन योजनांमुळे गडचिरोलीतील 7118 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. शिवाय या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेट्टी बॅरेजमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 25 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे. तेलंगणातील जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातील मेडिगट्टा येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री फडणवीस तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचीही उपस्थिती होती.
तेलंगणा सरकारचा हा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन राज्यांतील 45 लाख एकर क्षेत्राला वर्षातून दोन पिकांसाठी पाणीपुरवठा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजचा महाराष्ट्राला फायदा होणार असून या पाण्याचा वापर करून चार उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पेंटीपाका (3216 हेक्टर), रंगय्यापल्ली (848 हेक्टर), टेकाडा (2000 हेक्टर) आणि रेगुंठा (2052 हेक्टर) यांचा समावेश आहे. या चारही योजनांद्वारे 74.34 दलघमी (2.63 टीएमसी) पाण्याच्या वापरातून जिल्ह्यातील 7118 हेक्टर सिंचन क्षेत्रास फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर दोन्ही राज्यांमध्ये मच्छीमारी आणि नौकावहन करण्यात येणार आहे.
मेडीगट्टा बॅरेजच्या वरील बाजूला आष्टीजवळ तेलंगाणा सरकारकडून तुमडीहेटी बॅरेज प्रस्तावित आहे. या बॅरेजची पूर्ण संचय पातळी 148 मीटर असून महाराष्ट्र शासनाने त्यास तत्त्वत: मान्यता दर्शविली आहे. या बॅरेजमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 21 हजार 869 हेक्टर (4 उपसा सिंचन योजना) आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2471 हेक्टर असे एकूण 24 हजार 340 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
आंतरराज्य मंडळाच्या बैठकीत मेडीगट्टा बॅरेजची पूर्ण संचय पातळी 100 मीटर ठरविण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पाची साठवण क्षमता 16.17 टीएमसी इतकी आहे. या बॅरेजवरुन उपशाद्वारे 160 टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे. त्यातून 7 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन मिळणार असून आणि बिगर सिंचनासाठी 56 टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातील 40 टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि 16 टीएमसी पाणी औद्योगिक वापरासाठी होणार आहे.
या बॅरेजच्या बुडीत क्षेत्राच्या उजव्या बाजूला तेलंगणा राज्य असून डाव्या तिरावर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यात 45 किमीपर्यंत या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र येते. या बुडीत क्षेत्रामुळे 4.80 हेक्टर सरकारी आणि 178.51 हेक्टर खाजगी जमीन बाधित होते. त्यापैकी 121.96 हेक्टर खाजगी जमीन तेलंगाणा राज्याने सरळ खरेदीने विकत घेतली आहे.