शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर अखेर गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया, महाजन म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता, त्यावर टीका होऊ लागल्याने महाजन यांनी माफी मागितली आहे.
जळगाव : पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा क्रीडा मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे म्हणत गिरीश महाजन यामध्ये राजकारण करू नये असेही म्हंटले आहे. गिरीश महाजन यांच्या विधानावर अमोल मिटकरी यांनी एकेरी उल्लेख झाल्याचं निदर्शनास आणून दिले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठेही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांना माहिती आहे, शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडुन अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.
झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्यात कमीपणा नाही, पण त्याचं राजकारण होता कामा नये असं गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.
आजकाल कुणी काही बोललं तर लगेच चॅनलमध्ये, वर्तमान पत्रात जायचं, आरोप करायचे ही विरोधकांची पद्धतच झाली आहे.
विरोधक विकासावर बोलू शकत नाहीत म्हणून ते असेच विषय घेऊन ते पुढे येताय असं म्हणत अमोल मिटकरी यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीच गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती, त्यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका होऊ लागली होती.
गिरीश महाजन यांनी जळगावात यावर स्पष्टीकरण देत एकेरी उल्लेख झाल्याचे सांगत माझा तसा हेतु नव्हता असे म्हणत माफी मागितली आहे.
गिरीश महाजन यांनी पुण्यातील क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शासकीय अधिकारी यांच्यासमोरच हे विधान केले होते.