वीकेंडला फिरायला गेलेल्या मित्रांचा कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक मित्राचा जागीच मृत्यू झाला.
जळगाव : चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटून भीषण अपघात झाला (Jalgaon Car Accident). या अपघातात कार चालक मित्राचा जागीच मृत्यू झाला . तर तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात हा भीषण अपघात घडला. जखमी मित्रांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात भूपेंद्र संतोष पाटील याचा मृत्यू झाला आहे (Jalgaon Car Accident). तर त्याचे मित्र समेश पराग गुळवे, अलाफ राजेंद्र कुलकर्णी आणि विजय पाटील अशी जखमींची नावे आहेत.
रविवारची सुट्टी एकत्र घालवण्यासाठी हे चौघे मित्र सायंकाळी कारने (क्रमांक एमएच 19 बीजे 898) कोल्हे हिल्स परिसरात टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. टेकडीवर काही वेळ घालवल्यानंतर घरी परतत असताना उतारावर हा अपघात घडला. कार अलाफ कुलकर्णीची होती. पण घरी परतत असताना भूपेंद्र पाटील गाडी चालवत होता. कोल्हे हिल्स टेकडीच्या उतारावर समोरुन येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात भूपेंद्रचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.
या अपघातात भूपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. मृत भूपेंद्र पाटील हा एका खासगी बँकेत नोकरीला होता. अपघात घडल्यानंतर परिसरातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भूपेंद्रसह इतर तिघा जखमीं मित्रांना खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी भूपेंद्रला मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मिळताच भूपेंद्र आणि इतर तिघांच्या घरच्यांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. भूपेंद्रच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांनी टाहो फोडला. भूपेंद्रच्या मागे पत्नी, आई आणि वडील असा परिवार आहे.