जळगाव दूध संघाची निवडणूक कोणत्या खेळासारखी, एकनाथ खडसे यांच्या विरोधात गिरीश महाजन यांनी थोपटले दंड, म्हणाले…
एकूण 20 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे, सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
जळगाव : जळगाव दूध संघाची निवडणूक म्हणजे कबड्डी सारखी. मी क्रीडामंत्री आहे, आणि त्यात कबड्डीचा प्लेयर पण आहे, ते आता अंपायर आहेत तर त्यांना म्हणा कबड्डी खेळा, आणि जिंकून दाखवा अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. जळगाव दूध संघातील निवडणूक ही एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच अशी तयारीच नेत्यांनी केल्याचं चित्र आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना गिरीश महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी महाजन यांच्या विरोधात समोर खडसे अंपायर आहे असे विचारताच गिरीश महाजन यांनी खुलं चॅलेंज दिलं आहे. जळगावमधील निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप बघता संपूर्ण राज्याचे त्याकडे लक्ष लागून असतं त्यातच आता जळगाव दूध संघांच्या निवडणुकीला कुस्तीचा आखाडाच करून टाकल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात टोकाची टीका झाल्याचे बघायला मिळत असते.
त्यातच आता जळगाव दूध संघाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आमने-सामने आले असून या आज या निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.
एकूण 20 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे, आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
यावेळी महाजन यांनी विजय आमचाच होईल असा दावा करत करत कबड्डीचा खेळाडू असल्याचे सांगत निवडणूक जिंकूनच दाखवेल असा विश्वास महाजन व्यक्त करत आहे.
तर दुसरीकडे विरोधक म्हणजेच भाजप आणि शिंदे गट खोक्यांचा वापर करेल अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.