3 मजली इमारतीत अग्नितांडव, मध्यरात्रीत भीषण आग, तरुणाचा होरपळून मृत्यू, 4 जखमी
तीन मजली इमारतीला लागलेली ही आग एवढी भीषण होती की, इमारतीचे दोन मजले जळून खाक झाले.
अनिल कऱ्हेळे, जळगावः जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा येथील मुख्य बाजारपेठेत रात्रीच्या वेळी एका तीन मजली इमारतीला भीषण आग (Fire) लागली. या तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर कापड दुकान (Cloth shop fire) तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवाशांची घरं होती. रात्री सगळे झोपलेले असताना सुरुवातीला आगीची कल्पना कुणाला आली नाही. त्यामुळे तीची भीषणता वाढत गेल्यानंतरच रहिवाशांना जाणीव झाली. मात्र तोपर्यंत संपूर्ण इमारतीनं पेट घेतल्यानं नागरिकांना बाहेर पडणं मुश्कील झालं. या भीषण घटनेत एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.
बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न
या आगीची माहिती मिळताच, जळगावचे पोलीस तसेच नगर पालिका प्रशासनाने बचावकार्य सुरु केलं. अग्निशमक दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. रात्री दोन ते सव्वा दोन वाजेच्या सुमारास बचाव पथकाला यासंबंधी माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. नगरपालिकेचे पथक तसेच शहरातील तरुणांच्या मदतीनं आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. एका घरातून पाच वर्षांच्या चिमुकलीला बाहेर काढण्यात यश आले. तिच्यासोबत अन्य सहा जणांचेही प्राण वाचले.
एका तरुणाचा मृत्यू
रात्री झोपेत असतानाच ही आग लागल्यानं घरातील लोकांना काय करावं, हे समजत नव्हतं. याच धावपळीत एक तरुण बेडरुममधून निघाला आणि बाथरूममध्ये जाऊन थांबला. मात्र आगीचे लोट तिथवरही पोहोचले. या स्थितीत त्याला बाहेर पडता आलं नाही. आज सकाळी सहा वाजता तो जळालेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं.
आगीत सर्वकाही जळून खाक
तीन मजली इमारतीला लागलेली ही आग एवढी भीषण होती की, इमारतीचे दोन मजले जळून खाक झाले. घरातील पीओपी, जिन्यातील फरश्या, किचन ओटा, भांडीही जळून खाक झाली. सोफ्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली नोटांची बंडलंही जळून खाक झाली.
दरवाजे बंद असल्याने आग विझवण्यात अडथळे
रात्रीची वेळ असल्याने इमारतीतील सर्व दारं खिडक्या बंद होते. त्यामुळे आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी बाहेरून पाण्याचे फवारे मारण्यात येत होते. ते आगीपर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे आग विझवताना अडचणी आल्याची प्रतिक्रिया बचावपथकाच्या कर्मचाऱ्यानी दिली. आगीची भीषणता जास्त असल्याने चोपडा, अंमळनेर, यावल, शिरपूर, धरणगाव येथील अग्निशमन दलाची वाहनं बोलावण्यात आली होती.