पिकतं तिथं विकत कसं नाही? तिथूनच घेतलं आणि तिथेच करून दाखवलं, जळगावच्या सॅनिटरी पॅडची राज्यात चर्चा
सकारात्मक काम करण्याची जिद्द असेल तर नवे मार्ग, नव्या दिशा आपसूकच सापडतात. जळगावच्या महिला बचत गटानं हेच सिद्ध करून प्रेरणादायी आदर्श समोर ठेवलाय.
अनिक केऱ्हाळे, जळगाव : पिकतं तिथं विकत नाही, असं म्हटलं जातं. पण ज्या गावी जे पिकतं, तिथल्या विपुलतेचा लाभ घेत असंख्य प्रयोग करता येतात. या गोष्टी तिथल्याच नागरिकांसाठी वापरता येतात, असा मोलाचा संदेश जळगावकर (Jalgaon) महिलांनी दिलाय. जळगाव जिल्हा महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे तर अवघ्या देशात केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथली केळी जगप्रसिद्ध आहे. पण केळीचे घड कापून घेतल्यावर झाडाचे खोड फेकून दिले जाते. जळगावच्या झाशीची राणी महिला बचत गटाने या खोडाचा उत्तम वापर केला आणि त्यापासून पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिन तयार केले.
कसे तयार केले पॅड?
असे सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी केळीच्या खोडाचे तुकडे करण्यात येतात. त्यानंतर गरम पाण्यात त्याचा लगदा तयार केला जातो. त्यापासून एका पुठ्ठ्याची निर्मिती केली जाते. यापासून पुढे पॅड तयार करण्यात येतो. सॅनिटरी पॅडसाठी केळीचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असल्याचा दावा केला जातोय. महिलांनी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत याची तपासणी करून घेतली आहे. कापसापासून पॅडच्या आकारात ते बनवले जाते.
झाशीची राणी बचत गटाचा उपक्रम
जळगाव शहरातील आदर्शनगर भागातील अर्चना महाजन आणि रुद्रानी देवरे यांनी झाशीची राणी हा बचत गट सुरु केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी लागणाऱ्या सॅनिटरी पॅडची त्या निर्मिती करतात. मात्र ऑर्गेनिक पॅड कसे तयार करता येतील, यावर त्यांचे विचारमंथन सुरु होते. सहा महिन्यांपूर्वी केळीच्या खोडापासून सॅनिटरी पॅड तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर ऑर्गेनिक पॅड तयार करण्याच्या कामाला वेग आला. विशेष म्हणजे त्यांची विल्हेवाटही अगदी सहज करता येते.
20 महिलांना रोजगार
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या उद्योगातून वीस महिलांना रोजगार दिला आहे. काही मिनिटांत डिस्ट्रॉय होणारे हे पॅड पर्यावरणपूरक व महिलांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. झाशीची राणी महिला बचत गटाने विविध प्रकारचे पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड तयार केले. त्यामुळे या परिसरातील मॅटर्निटी पॅडचा तुटवडादेखील कमी झाला. 40 बाय 10 सेंटिमीटरचे हे मॅटर्निटी पॅड मार्केटपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी झाल्या आहेत.
नाबार्डकडून प्रोत्साहन
जळगावातील या बचत गटाची नाबार्डकडूनही निवड करण्यात आली आहे. . या व्यवसायासाठी मशिनरी देण्यात आल्या आहेत.इथे महिन्याला 1लाख 5 हजार पॅडची निर्मिती केली जाते. त्यासाठी साडे 4 लाख रुपये खर्च येतो. तर जवळपास 6 लाख तीस हजार रुपयांची दर महिन्याला उलाढाल होते. त्यातून पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. यामार्फत 20 महिलांना रोजगार मिळतो.