आई-वडील कामावर गेले होते, मुलगा मित्रांसोबत पोहायला गेला तो परतलाच नाही !
आई-वडील कामाला गेले. चार भावंडं घरी एकटी होती. मात्र 11 वर्षाच्या मुलाला मित्रांसोबत पोहण्याचा मोह झाला अन् ही त्याची शेवटची अंघोळ ठरली.
जळगाव : मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. सोमवारी 15 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. आई-वडिल शेतात कामासाठी गेले असता ही घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा धरणाच्या पाण्यात बुडाला. बालकाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलगा दुसरीच्या वर्गातून तिसरीत गेला होता. मुलाच्या दुर्दैवी जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गावातील मित्रांसोबत पोहायला गेला होता
मयत मुलगा जळगाव जिल्ह्यातील एका गावात आई-वडील आणि तीन भावंडांसोबत राहत होता. मुलाचे वडील हे ट्रॅक्टर चालक आहेत, तर आई शेतमजुरी करते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. यावेळी चारही भावंडे घरीत होते. दुपारी 4 च्या सुमारास 11 वर्षाचा मुलगा गावातील मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला
मात्र पाण्याचा कोणताही अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाबत सोबत असलेल्या तीन मित्रांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. यानंतर गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी काही पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उडी घेऊन मुलाला बाहेर काढले. मुलाला खासगी वाहनाने तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू केले. बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.