“गुलाबराव पाटील कधी चौकटीत राहून बोललेत?”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या भाषेतच उत्तर
आज संजय राऊत यांच्या टीकेवरून जरी आरोप केले जात असले तरी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे चौकटीच्या बाहेर राहून अनेकदा बोलले आहेत असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेक कारणांनी ढवळून निघाले. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जोरदारपणे चालू आहे. तर सध्या महाविकास आघाडीच्या सभा उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात आणखी जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत असतात.
त्यावरून आता राजकारण तापले आहे. सध्या महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडून ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे.
महाविकास आघाडीची नागपूरमधील वज्रमूठ सभा झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेत चौकटीत राहून बोलावं अन्यथा सभेत घुसू अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावरून आता एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जे गुलाबराव पाटील खासदार संजय राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा सल्ला देतात, ते गुलाबराव पाटील चौकटीत राहून कधी बोलले आहेत असा टोलाही त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र आरोप करणारी व्यक्ती कोण आहे त्यावरही त्या आरोपांचे गांभीर्य टिकून असते असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
त्यामुळे ज्यांनी संजय राऊत यांना चौकटीत राहून बोलण्याचा सल्ला दिला आहे, मुळात तो सल्लाच त्यांचा हास्यस्पद असल्याची टीकाही खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांची भाषा पाहिल्यानंतर कोणालाही लक्षात येईल की कोणता नेता चौकटीत राहून बोलण्याचा प्रयत्न करतो.
त्यामुळे ज्यांनी हा सल्ला दिला आहे त्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी हे सांगावं की ते कधी चौकटीत राहून बोलले आहेत का असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
आज संजय राऊत यांच्या टीकेवरून जरी आरोप केले जात असले तरी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे चौकटीच्या बाहेर राहून अनेकदा बोलले आहेत असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.
त्यामुळे गुलाबराव पाटील यांची चौकटीत राहून बोलावं ही अपेक्षा ठीक आहे मात्र त्याची सुरुवात स्वतः पासून केली तर अधिक संयुक्त होईल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.