पंतप्रधान मोदींच्या 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटे काँग्रेसवरच टीका, खडसेंचा टोला; चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर
देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.
जळगाव : काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi Speech) यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल चढवल्यापासून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर आणि भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. कारण काँग्रेसने कोरोनात मजुरांना तिकीटं देऊन कोरोना पसरवल्याचा थेट आरोप काल मोदींनी केला. त्यानंतर सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसने दिला आहे. मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनीही खोचक टोला लगावला आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात राजकीय दुजाभाव दिसतो. देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.
मोदींचं वक्तव्य खेदजनक-खडसे
महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला हे मोदीजीं चे वक्तव्य म्हणजे खेदाची बाब आहे. पाकिस्तानमधून अतिरेकी येत आहेत ते थांबले नाहीत मोदींना असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मागच्यावेळी गोवा निवडणुकीचे चित्र वेगळे होते. गोव्यात इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. यावेळेस इतर पक्षाचा जोर गोव्यात जास्त आहे. भाजप विषयी नाराजी आहे. उत्पल पर्रीकरांनना तिकीट त्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असे भाकितही खडसेंनी केले आहे. गोव्यात सध्या भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोर लावत आहे. आजच जाहीरनाम्यात भाजपने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे खडसेंचा हा अंदाज किती खरा ठरतो? हे निकालानंतरच कळेल.
चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान
अजित पवार यांनी जमीन लाटण्याचं काम केलं या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावरून चंद्रकांत पाटलांना खेडसेंनी खुलं आव्हान देऊन टाकलं आहे. चंद्रकांत दादा त्यांच्या अनुभवातून बोलले असतील. मीही विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले. मी नेहमी पुराव्यानिशी बोललो. माझे चंद्रकांत पाटलांना आव्हान आहे त्यांनी पुराव्यानिशी बोलावे, असेही खेडसे म्हणाले आहेत. तसेच अवैध मार्गाने मालमत्ता कोणी जमा केली असेल तर तुम्ही विरोधी पक्षात आहात. हे प्रकरण विधानसभेत पुराव्यानिशी मांडा. पक्के पुरावे द्या, फक्त गप्पा मारू नका. नुसते आरोप करायचे हे काम विरोधकांचं सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.