‘तेव्हा गिरीश महाजनांनी माझे पाय धरले होते’, एकनाथ खडसे यांचा धक्कादायक दावा
"गिरीश महाजनांनी आपण निवडून यावे म्हणून माझे पाय धरले होते", असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
जळगाव : खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात वारंवार कलगीतुरा रंगताना दिसतो. दोन्ही बड्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जातात. हे दोन्ही नेते एकेकाळी एकाच पक्षात होते. पण खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हाती घेतल्यामुळे महाजन त्यांचे राजकीय शत्रू बनले. खरंतर दोघांमधील मतभेद पक्षांतर्गतदेखील होते. पण ते मतभेद उफाळून आले नव्हते. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हापासून खडसे-महाजन यांच्यात वारंवार वादविवाद होताना दिसतात. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केलाय. गिरीश महाजनांनी आपण निवडून यावे म्हणून आपले पाय धरले होते, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. “जामनेरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जंगी सभा झाली होती. तेव्हा गिरीश महाजनांनी धावत पळत येऊन माझे पाय धरले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
एकनाथ खडसे यांनी भाजपात असतानाचा एक पक्षांतर्गत किस्सा सांगितलाय. यावेळी त्यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला.
“राजकारणात मी गिरीश महाजनांना मदत केली, आज मीच दुश्मन झालो”, असं सांगत खडसेंनी खंत व्यक्त केली.
“गिरीश महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा यांची बोदवडला होणारी सभा जामनेरला घेतली. सोनिया गांधी यांच्या सभेपेक्षा ती सभा मोठी झाली म्हणून वातावरण बदललं आणि गिरीश महाजन निवडून आले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.
“असं असताना आता तेच गिरीश महाजन नाथाभाऊला बघून घेईन अशी भाषा करतात. ईडी लावू, सीडी लावू, इन्कम टॅक्सची चौकशी लावून बघूनच घेतो नाथाभाऊ तुला”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“तुम्हाला राजकारणात मदत केली. मी काय घोडं मारलंय तुमचं?”, असं म्हणत खडसेंनी नाराजी व्यक्त केली