एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का? एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल
देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली मात्र तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
जळगाव: राज्य गुप्तवार्ता विभागाकडील गोपनीय अहवाल बाहेर गेल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा काल जबाब नोंदवण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले होते. महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप नेत्यांनी टीका केली होती. तर, भाजप नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर देण्यात आलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा जळफळाट सुरु झाला असल्याचं म्हटलं. एक नोटीस आली आणि त्यांची पिळवणूक होत आहे, असा दावा करण्यात येतोय. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली मात्र तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं पिळवणूक
एकनाथ खडसे यांनी मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायको बरोबर फोन कॉलचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं एकनाथ खडसे म्हणाले. अंजली दमानिया यांना माझ्यामागे लावण्यात आलं. हे उद्योग कोणी केले? अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे.
देवेंद्रजीच्या कालखंडात माझे फोन टॅप
एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात माझे फोन टॅप करण्यात आले आहेत असा आरोप केला. फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत त्यांचेच फोन टॅप होतात. माझे काय देशद्रोहीचे संबंध आहेत का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. माझा फोन टॅप करण्याचं कारण काय, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. नंतरच्या कालखंडात ईडी कुणी लावली त्यांनीच लावली. इतकं मला छळण्यात आलं मी त्याला सामोरं गेलो. तुम्हाला नोटीस आली की जळफळाट केलात. विरोधात असणाऱ्यांचा छळ केलात त्यामुलं नाथाभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली, असं एकनाथ खडसे म्हणाले.
इतर बातम्या: