किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,जळगाव | 7 March 2024 : सुवर्णनगरी जळगावमधील सराफा बाजारात सोने एकदम वधारले आहे. गेल्या 48 तासांत सोन्याने 2 हजारांची उडी घेतली. जीएसटीसह 24 कॅरेट सोने प्रतितोळा 66 हजार रुपयांच्या घरात पोहचले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये सोन्याने धुमाकूळ घातला आहे. लग्नसराई सुरु असतान सोन्याच्या या दमदार खेळीने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. मार्च महिन्यात सोन्याने एकदम उसळी घेतली आहे. सोने अजून 70 हजारांचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वर्षभरातील उच्चांक
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने वर्षभरातील नवीन उच्चांक गाठला. अवघ्या 48 तासांत भाव गगनाला भिडले. दोन हजारांची रेकॉर्डब्रेक चढाई सोन्याने केली आहे. आज, 7 मार्च रोजी सुवर्णनगरीत 64,500 रुपये असा सोन्याचा भाव आहे. जीएसटीसह सोन्याचे दाम 66 हजार रुपयांच्या घरात पोहचतात. त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे. त्यांना आज अधिक पैसे मोजावे लागत आहे. जळगावात चांदीच्या भावात 700 रुपयांची घसरन होऊन ती 72 हजार 800 रुपये प्रति किलो वर आली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 64,493 रुपये, 23 कॅरेट 64,235 रुपये, 22 कॅरेट सोने 59,075 रुपये झाले.18 कॅरेट 48,369 रुपये, 14 कॅरेट सोने 37,728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,710 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट