गिरीश महाजन-गुलाबरावांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक, खडसेंना खबरच नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना एकाकी पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना एकाकी पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. जळगावमध्ये सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत खडसेंना एकाकी पाडून टक्कर देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे खडसेंना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजप नेते आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन शिंदे गटाचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत मिळून एकनाथ खडसे यांना एकटं पाडण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग आखत आहेत.
विशेष म्हणजे जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांना सोडून राष्ट्रवादीसह इतर पक्षांना भाजप-शिंदे गटाच्या सोबत घेऊन सर्वपक्षीय पॅनल स्थापन करण्याचा गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचा प्रयत्न आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गुप्त बैठक घेतलीय. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची उपस्थिती होती.
जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथ खडसे यांच्या समर्थक पॅनलची सत्ता होती. विशेष म्हणजे जिल्हा दूध संघात गेल्या अनेक वर्षांपासून खडसेंचं वर्चस्व आहे. खडसेंच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आता भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्यात तीन महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर लगेच सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने एकनाथ खडसे यांना झटका देण्यासाठी जळगाव जिल्हा दूध संघातील समिती बरखास्त केली होती. या समितीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले होते. याच आरोपांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित समिती बरखास्त केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झालीय. या निवडणुकीत खडसेंच्या पॅनलला एकटं पाडण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या पडद्यामागचे मुख्य सूत्रधार सध्या तरी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.