Gulabrao Patil : आता आम्ही नवरीवाले झालो तर भाजप नवरदेववाले; गुलाबराव पाटलांचे बीजेपीला चिमटे; अशी जाहीर केली नाराजी
Gulabrao Patil attack on BJP : खानदेशातील मंत्री गुलाबराव पाटील म्हणजे शिवसेनेची मुलूखमैदान तोफ, या तोफेचे तोंड आता महायुतीमधील मित्रपक्षाकडे वळाल्याने सगळीकडे चर्चा झाली आहे. त्यांनी भाषणातून भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत. काय म्हणाले गुलाबराव पाटील?
मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणातून सध्या मित्रपक्ष भाजपावर जोरदार प्रहार केला. त्यांनी मित्रपक्षाला केवळ चिमटेच काढले नाही तर युती धर्माची आठवण पण करून दिली. आपल्या खास भाषणासाठी गुलाबराव पाटील ओळखल्या जातात. आजही त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी लोकसभेत मित्रपक्षासाठी राबराबल्याची आठवण करून दिली. विरोधकांवर तुटून पडणारे गुलबराव आज मित्रावरच का नाराज झाले, याची चर्चा सगळीकडे रंगली होती.
लोकसभेतील कामाची करून दिली आठवण
लोकसभेच्या वेळेस स्मिता वाघ उमेदवार नव्हत्या आम्ही स्वत: उमेदवार होतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही हेच सांगायचं स्मिताताई खासदार होणार, तर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आहेत. आणि त्यांच्या करता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला. माझ्या मतदारसंघांमध्ये 63 हजाराचा लीड दिला किशोर आप्पा पाटलांच्या मतदारसंघात लीड दिली. त्यावेळेस आम्ही नवरदेव वाले होतो. तर भाजपवाले नवरीवाले होते. पण आजच्या कार्यक्रमाला निमंत्रण पाठवून पण भाजपवाले नाहीत. आता आम्ही नवरीवाले आहोत आणि भाजपवाले नवरदेववाले झाले आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
नाराजीचे कारण तरी काय?
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी आ निर्धार मेळावा आयोजित केला होता. भाजपाचे एकही मंत्री किंवा आमदार, खासदार उपस्थित नव्हते. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी देखील या मेळाव्यास उपस्थित नव्हते. मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेले होते. मात्र या सर्वांनी या निर्धार मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने भर सभेमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
वरिष्ठांकडे नोंदवणार नाराजी
वरिष्ठांकडे आजच्या मेळाव्याचे घडलं या गोष्टी मी मांडणार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. युतीमध्ये अशा गोष्टी घडता कामा नये याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल. उद्याच्या दिवशी मुंबईला कॅबिनेट मिटींग आहे त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर हा प्रकार आम्ही मांडणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आपण एक संघ होतो म्हणून विपरीत वातावरण असताना सुद्धा दोन जागा निवडून आल्या. त्याचप्रमाणे जर आपण विधानसभेत एक संघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात. मात्र आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असे पाटील म्हणाले.