गुलाबराव पाटील यांनी खडसे कुटुंबीयांचा किस्सा सांगितला, म्हणाले, तुमचा खोका तुम्ही…
४५ वर्षांच्या पक्षानं तीन-तीन वेळा मंत्री केलं. विरोधी पक्षनेता केलं. आम्हाला काय खोके म्हणता.
जळगाव : दूध फेडरेशनसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यंदा एंट्री केली. मतदानादरम्यान बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आपलं तूप साताऱ्याला ठेवलं. हा दूध फेडरेशनचा विकास आहे. जळगाव जिल्ह्यात एकही कोल्ड स्टोरेज नव्हते. म्हणून तूप साताऱ्याला पाठविलं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे कुटुंबीयांना लगावला. तसेच १५ रुपये किलो भाडं भरलं त्याचं. हा फार मोठा विकास झालाय.
अहो त्यांना दुसरं काही भांडवलं राहील नाही. स्वतः पक्षांतर केलं. आम्हाला बोलून काय उपयोग आहे. आम्ही तर शिवसेनेतच आहोत, असा टोली एकनाथ खडसे यांना गुलाबराव पाटील यांनी लगावला.
गुलाबराव पाटील म्हणाले, ४५ वर्षांच्या पक्षानं तीन-तीन वेळा मंत्री केलं. विरोधी पक्षनेता केलं. आम्हाला काय खोके म्हणता. स्वतः तुमचा खोका तपासा तुम्ही.
दूध फेडरेशन आम्हाला वाचवायचं आहे. साखर कारखाना विकला गेला तसं हे दूध फेडरेशन विकलं जाऊ नये. याकरिता आम्ही उभे असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले.
तूप, लोणी दिसतं म्हणून सगळे आल्याचा आरोप केला जातोय. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ७५ रुपये किलो तूप कुणी विकलं. गुलाबराव पाटील तर नव्हता ना तिथं. गुलाबराव पाटलाच्या काळात असं काही घडलं तर पहिल्या दिवशी राजीनामा देईन, असं गुलाबराव पाटील यांनी ठकणावून सांगितलं.
मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मतदान केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत आमच्या पॅनलचा दणदणीत विजय होणार आहे. हरण्यासाठी कुणी लढत नाही. प्रत्येकजण लढण्यासाठी निवडणुकीत उतरतो.
प्रचाराच्या आणि लोकांच्या उत्साहावरून अंदाज लावता येतो. आम्हाला असा अंदाज आहे की, लोकांच्या प्रतिसादामुळं आणि लोकांच्या उत्साहामुळं निश्चितपणानं आमचा विजय होईल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.