‘बायको सरपंच झाली तर नवऱ्याचं फक्त एवढंच काम त्याने…’ गुलाबराव पाटलांची जोरदार फटकेबाजी
जळगावमध्ये बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 'मी भरपूर असे सरपंच पाहिले की त्यांनी गावासाठी खूप कामं केली, मात्र पुढच्या वेळी विचारलं काय झालं? तर ते सांगतात, संपूर्ण पॅनल पडलं, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

जळगावमध्ये बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. ‘मी भरपूर असे सरपंच पाहिले की त्यांनी गावासाठी खूप कामं केली, मात्र पुढच्या वेळी विचारलं काय झालं? तर ते सांगतात, संपूर्ण पॅनल पडलं. मला वाटतं ग्रामपातळीवर सुध्दा सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे, जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता सर्वांमध्ये झाली पाहिजे, त्याशिवाय विकासाचे हे पर्व चालू शकत नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या लाडक्या बहिणी सरपंच आहेत, नवऱ्यांना माझी विनंती आहे की गावच्या कारभारात डोकावू नका, महिलांना थोडं काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे राहा, तुमचे काम तेच आहे. बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, मग ती सरपंच झाली तर तिच्या मागे उभा रहा ना काय फरक पडतो, पतीचे काम हे फक्त प्रॉम्टिंग कराचे आहे.
सरपंच किती काम करतो? हे पोस्टरवर नव्हे तर जमिनीवर दिसलं पाहिजे, काही लोक बॅनर लावतात कार्यसम्राट, भावी आमदार वगैरे -वगैरे पण त्याच्या गावातील गटार ओसांडून वाहत असेत तरी देखील त्याचं लक्ष नसतं, वा रे वा सरपंच. पोस्टरबाजी करण्यापेक्षा पन्नास टक्के तरी त्या गावात प्रत्यक्षात तेथील सरपंचाचं काम असलं पाहिजे.
पाणी पिऊन पिऊन लोक शिव्या देतात, सरपंच होणं एवढं सोपं नाही, आमदार होणं सोप आहे, आमदाराचं कसं असतं, या गावात मत भेटले नाही तर त्या गावात भेटतात. पण सरपंचांचं तसं नाही, मेरे बाप को उसके बापने गिराया था असं असतं, चुन चुन के बदला लेंगे, शेत विकून टाकेल पण त्याला पाडणार, अशी मानसिकता असते, त्यामुळे गावात हजार मतांपैकी 600 मत घेणं देखील खूप अवघड आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.