उद्धव ठाकरेंच्या आक्रमक नेत्यावर जळगावात मोठी कारवाई, भाषण करण्यास बंदी
जळगावात ठाकरे गटाचे आक्रमक नेते शरद कोळी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केलीय.
जळगाव : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते आणि युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर शरद कोळी पुन्हा कार्यक्रमात भाषण करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात झालेल्या महाप्रबोधन सभेत सुषमा अंधारे यांच्या समवेत ठाकरे गटाचे प्रमुख वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाषण केलं.
या दरम्यान शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या पी प्राईड हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाषणास का बंदी घातली याचीदेखील कोळी यांना माहिती दिली.
दरम्यान, पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद कोळी यांना अटक करण्यासाठी पोलीस हॉटेलमध्ये आल्याचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आरोप केलाय.
ठाकरे गटाचे नेते शरद कोळी गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर प्रचंड खोचक टीका केलीय.
शरद कोळी आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीमुळे ते राज्यभरात चर्चेच आले आहेत. त्यांच्या भाषणाकडे अनेक कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. पण शरद कोळी यांनी आपल्या भाषणात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना महाप्रबोधन यात्रेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भाषण करता येणार नाहीय.
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट
या दरम्यान मोठा गोंधळ उडाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आलीय.
शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या दरम्यान शिवसैनिक संतप्त झाल्याने पोलिसांसमवेत सुषमा अंधारे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ठाकरे गटाचे वक्ते पायी शहर पोलीस ठाण्याकडे निघाले.