जळगावमध्ये सोने-चांदीने मोडला रेकॉर्ड; सराफा बाजाराच्या इतिहासात विक्रमी दर
Jalgaon Gold And Silver Price Today : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगानेच नाही तर जागतिक बाजाराने पण धसका घेतला आहे. शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचे सराफा बाजारात पडसाद दिसत आहेत.

किशोर पाटील, प्रतिनिधी, जळगाव : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार येताच जगभरातील बाजारात उलथापालथ सुरू आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगानेच नाही तर जागतिक बाजाराने पण धसका घेतला आहे. शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचे सराफा बाजारात पडसाद दिसत आहेत. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रम केला आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात विक्रमी दर मिळाला आहे.
सोन्याचा विक्रमी दर
जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह 88 हजार 475 रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह 99 हजार 910 रुपयांवर पोहोचले आहे.




बाजाराचा ट्रेंड बदलला
आधी कमी दरात सोने चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्यामुळे सराफा बाजारात सोनं चांदी मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीचे आजचे दर हे आतापर्यंतचे बाजाराच्या इतिहासातले विक्रमी दर असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
युद्धाचा तणाव, राष्ट्राध्यक्ष यांचे नवीन धोरण, फेडरल बँकेने कायम ठेवलेले व्याजदर, रुपयाचे मूल्य कोसळले आहे. ही सोन्याने चांदीचे दर वाढण्या मागची कारणं आहेत. सोन्याचे दर 90 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर हे एक लाखांच्या उंबरठ्यावर आहेत.
लवकरच नवीन विक्रम
सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्व कारणांमुळे सोन्या चांदीच्या दराने विक्रम केल्याचा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे. सोन्याचा दर 90 हजारांचा चांदीचे दर एक लाखांचा आकडा पार करेल अशी शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोन्याच्या भावात 2,430 रुपयांची उसळी
दुसरीकडे मुंबईतील जव्हेरी बाजारात सोन्याच्या भावात 2,430 रुपयांची उसळी दिसून आली. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक भाव सोमवारी 85,665 रुपये प्रति 10 ग्रॅमवर इतका होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. जागतिक धातू वायदा बाजारात‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रति औंस 45 डॉलरने वाढून 2,932 डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे.