भाजपला ओळखायला रोहित पवारांना अजून…; अजित पवार गटातील नेत्याचा टोला
Anil Patil on Rohit Pawar and NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवारांना भाजप समजायला अजून बराच काळ जावा लागेल, असं अनिल पाटील म्हणालेत. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सातत्याने भाजपवर टीका करताना दिसतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते महायुतीला घेरण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिलं आहे. भारतीय जनता पार्टीला ओळखायला रोहित पवार यांना अजून किमान 35 वर्षे लागतील. भारतीय जनता पार्टीचा माणूस तर भाजपला उमेदवाराला सोडणारच नाही. पण भाजपाला मानणारा महायुतीला सोडणार नाही. हा सुद्धा अनुभव रोहित पवार यांना या निवडणुकीत आल्याशिवाय राहणार नाही, असं अनिल पाटील म्हणाले.
शिवतारेंच्या भूमिकेवर पाटील म्हणाले…
शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांनी घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी माघार घेतली आहे. त्यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, महायुतीचे जे जे नेते असतील त्यांचे मी आभार मानतो. कारण कुठेना कुठे आमच्या नेत्याचा मान सन्मान झाला आहे. विजय शिवतारेसाहेब यांच्याकडून चुकीची वक्तव्य केली जात होती, असं अनिल पाटील म्हणाले.
विजय शिवतारे हे वारंवार काही वक्तव्य करत होते. त्यांच्या वक्तव्याने दुःख आम्हाला सातत्याने होत होतं. यावर पडदा टाकण्यासाठी महायुतीच्या लोकांनी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्या महायुतीच्या सर्व नेत्यांचं तसेच शिवतारे यांचे मी मनापासून आभार मानतो. गुण्या गोविंदाने सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. असं सर्वांना आवाहन करतो, असं अनिल पाटील म्हणाले.
भुजबळांना उमेदवारी मिळणार?
महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळसाहेब काय बोलले मला माहित नाही. जळगाव, धुळे नाहीतर किमान नाशिकची जागा आम्हाला मिळावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. यामुळे उत्तर महाराष्ट्रात एक तरी जागा मिळाल्याचा आम्हाला समाधान असू शकतो. पक्षाने आणि महायुतीने जर त्यांना जबाबदारी दिली तर त्यांनी निवडणूक लढू शकतात. शिवसेना शिंदे गट सुद्धा या जागेवर आकडे असेल तर प्रत्येक पक्षाचां तो अधिकार असतो. भाजपचाही या जागेवर आग्रह आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणचे ताकद बघून राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा या ठिकाणी आग्रह आहे, असं अनिल पाटील म्हणाले.