मोठी बातमी : शरद पवारांना मोठा धक्का, निवडणुकीनंतर ‘तो’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार
Sharad Pawar Group Leader Gulabrao Devkar on Ajit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना माजी मंत्री देवकर यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही अपेक्षित यश मिळालं नाही. शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले. असं असताना निवडून झाल्यानंतर खान्देशातील बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार
अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सर्वात आधी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे. माजी मंत्री, जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
गुलाबराव देवकर काय म्हणाले?
चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं. अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव देवकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पचवत नाही, तोच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर आगामी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं बळ यानिमित्ताने मिळणार आहे.