विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी; पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश
NCP Sharad Pawar Party Executive dismissed : विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची जळगावमधली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. वाचा राष्ट्र्वादीत नेमकं काय घडतंय?
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे… राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच राजकीय पक्ष लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या हालचाली होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारणी जळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील ही घडामोड महत्वाची आहे. तर जळगावच्या जिल्हाध्यक्षांनीही पराभवाची जबाबदारी स्विकारत आपला राजीनामा दिला आहे.
पक्षाच्या मंथन बैठकीत काय घडलं?
लोकसभेतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर जळगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या चिंतन आणि मंथन बैठकीत सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा निर्णय झाला आहे. या बैठकीत निरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांनी सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारणी नियुक्त करण्याची विनंती यावेळी बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसमोर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची नवीन जिल्हा कार्यकारणी जाहीर होणार आहे.
जळगाव जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
लोकसभेच्या पराभवाचे जबाबदारी स्वीकारत जळगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने त्याची जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी म्हटलं आहे. रावेर लोकसभेत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. हा पराभव ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देत आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना निरीक्षक प्रसन्नजीत पाटील यांनी दिल्या आहेत. तर येत्या काहीच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जळगाव जिल्हा कार्यकारणी जाहीर होणार आहे.