जळगाव | 1 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. याबाबत मंत्री अनिल पाटील यांना प्रश्न विचारला असता “काहीतरी गडबड घोटाळे केल्याशिवाय ही चौकशी होत नाही”, असं मोठं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरुन त्यांच्या समर्थकांकडून त्याविरोधात राज्यभरात काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे.
“रोहित पवार यांचं नाणं खणखणीत असेल तर राज्यातील काय केंद्रातलं कुठलंही सरकार त्यांचं काहीही करू शकतं. सत्य काय आणि असत्य काय आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. मात्र पॉलिटिकल इव्हेंट करून आम्ही काहीही केलेलं नाही, असा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा एक केविलवाना प्रयत्न सुरू आहे”, अशी टीका अनिल पाटील यांनी केली.
“ज्यांची ज्यांची ईडीची चौकशी सुरू आहे किंवा भविष्यात होणार आहे त्यांनी काहीतरी गडबड घोटाळे केल्याशिवाय ही चौकशी होत नाही. हा केवळ पॉलिटिकल शो चालला आहे. कारण यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी झालीय. ज्यांची चौकशी झाली ते ईडीच्या कार्यालयात जायचे. चौकशी झाली की माघारी यायचे”, असं अनिल पाटील म्हणाले.
“मी 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांच्या केवळ नेमणुका होत होत्या. अनेक निवडणुका झाल्या तरी आपण किमान प्राथमिक सदस्य आहोत की नाही हे बघितले नाही. त्यामुळे याबाबत संभ्रमवस्था आहे. पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष पासून ते गाव पातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत निवड जी आहे ती निवडणुकीच्या स्वरूपात झाली पाहिजे. निवडणुकीच्या कामकाजात सहभागी व्हायचं असेल तर त्याला कमिटीचा सदस्य व्हावं लागतं. राज्यातून सदस्य म्हणून जावं लागतं. त्यामुळे प्राथमिक सदस्य होणे गरजेचे असतं”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की, “छगन भुजबळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी.” याबाबत अनिल पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “छगन भुजबळ हे 30 ते 35 वर्षांपासून ओबीसींसाठी लढा देत आहेत. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. ओबीसींकरता भुजबळ यांना अनेकदा मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे राजीनामा घेणे आणि राजीनामा देणे हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. ओबीसींचे संरक्षण करणे ही त्यांची मूळ जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ते निभावत आहेत”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.