आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?

| Updated on: Dec 30, 2023 | 8:36 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निकालाच्याआधी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील या प्रकरणावर मोठा दावा केला आहे.

आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य, महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 30 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 10 जानेवारीला निकाल लागणार आहे. या निकालावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला अंतिम निकाल 10 जानेवारीला जाहीर करणार आहेत. या निकालावर राज्याच्या राजकारणाचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागलं तर सध्याचं सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल. पण निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप घडून येईल. कदाचित लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांचीदेखील घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांनी या प्रकरणावर मोठा दावा केला. “शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात काहीच होणार नाही. या सर्व वावड्या आहेत, रामलल्लाच्या कृपेने आम्ही सत्तेत राहणार आहोत”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

गुलाबराव पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. नव्या वर्षात तुमचा संकल्प काय? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “सरकारच्या माध्यमातून शेतकरी असेल किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. येणारं वर्ष हे रामलल्लाचं वर्ष आहे. या नवीन वर्षामध्ये रामलल्ला येत आहे. त्याबरोबरच पुढचा काळातही रामराज्य देशात असावं ही नवीन वर्षाची मनोकामना आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

‘आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो, मात्र…’

पुढील वर्ष निवडणुकीचं आहे. तुम्ही पुन्हा निवडणुकीत उभं राहणार, यंदा मात्र शिवसेनेत फूट पडली आहे, त्यामुळे निवडणुकीत पुन्हा निवडून येणार का, काय वाटतं? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो. मात्र हिंदुत्वाच्या विचाराने भाजप-शिवसेनेची युती होती. त्याच पद्धतीने आता आम्ही युती केलेली आहे. देशाचा आणि राज्यातील जनतेचा कल पाहिला तर नवीन वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या तीनही पक्षांच्या महायुतीचाच विजय होईल, अशी मला खात्री आहे”, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

‘निवडणूक जिंकणार असा विश्वास’

निवडणुकीत लोकांसमोर कसं जाणार? असा सवाल गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण निवडणूक जिंकूच, असं सांगितलं. “विरोधकांनी कितीही टीका केली तरी काम करत राहा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. जनतेशी आमचा जनसंपर्क आहे. त्या जनसंपर्काच्या बळावर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर तसेच लोकांशी आम्ही जुळवून घेत आहोत. आमच्यात अहंपणा नाही. या सर्व मुद्द्यांच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या भक्कम नेतृत्वामुळे निवडणूक जिंकणार असा विश्वास आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांना खोचक सल्ला

महायुतीकडून राज्यात 45 पेक्षा लोकसभेच्या जागा जिंकणार असा दावा केला जातोय. याबाबत गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अब की बार 400 पार अशा पद्धतीचे चित्र या देशात असणार आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनादेखील एक सल्ला दिला. “संजय राऊत साहेब आता तरी शांत व्हा. जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं, ते स्वप्न अयोध्या येथील राम मंदिर पूर्ण होत आहे. रामलल्लाकडे बघून नतमस्तक व्हावं. तोंडाला चांगल्या पद्धतीने आवर घालाव, उद्धव ठाकरे यांना फसवू नये हीच माझी अपेक्षा आहे”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.