‘त्यांच्यात I Love You चं नातं’ गुलाबराव पाटील नेमकं काय बोलून गेले? पाहा VIDEO

| Updated on: Jun 17, 2023 | 6:59 PM

मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. जाहिरातीच्या वादानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात डॅमेज कंट्रोल झालं आहे. पण या वादाबद्दल गुलाबराव यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं.

त्यांच्यात I Love You चं नातं गुलाबराव पाटील नेमकं काय बोलून गेले? पाहा VIDEO
Follow us on

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात गेल्या आठवड्यात वाद निर्माण झालेला बघायला मिळाला. शिवसेनेकडून छापून आणण्यात आलेल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता जास्त असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तसेच संबंधित जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे अशा शिर्षकाखाली ही जाहिरात छापून आणण्यात आलेली. या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी पसरली होती. तसेच दोन्ही बाजूने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर दोन्ही बाजूने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आय लव्ह यूचं नातं असल्याचं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये उफाळून आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

“कितीही माणूस हुशार असला तरी जाहिरात देताना चुका होतात. जाहिरात म्हणजे स्वत:चं मत आहे, असं मला वाटतं नाही. आम्हीही गाव पातळीवर कधी कधी जाहिराती देतो, त्यात सरपंचाचा फोटो राहून जातो. हे मोठ्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी येऊ शकतात”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“जाणीवपूर्वक चूक झाली असं मला वाटत नाही. चूक लक्षात आल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी दुरुस्त केली. मनात तसं नव्हतं म्हणून चूक दुरुस्त केली, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. उद्या राष्ट्रवादीने काँग्रेसची तशी जाहिरात दिली आणि चूक झाली तर?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

शिंदे-फडणवीस यांचा एकाच हेलिकॉप्टरने प्रवास

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यात जाहिरातीवरुन वाद निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाणं टाळलं होतं. त्यामुळे भाजप नाराज असल्याच्या चर्चांना जोर आला होता. याशिवाय भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर उघडपणे नाराजी जाहीर केलेली. त्यानंतर दोन्ही बाजूने तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. अखेर शिंदे आणि फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्यासाठी पालघर दौऱ्याला जाताना एकत्र हेलिकॉप्टरने प्रवास केला. तसेच शिंदे-फडणवीस दोघांकडून आपण एक आहोत, असं भाषणात सांगण्यात आलं.